बलरामपूर - उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओमध्ये दोन तरुण एक मृतदेह पुलावरून नदीपात्रात फेकताना दिसत आहेत. सिसई घाटावर असलेल्या पुलावर हा धक्कादायक प्रकार घडला असून इथून जाणाऱ्या एका वाहन चालकानं तो मोबाईलमध्ये चित्रित केला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर घटनेची चौकशी करुन दोघांना अटक करण्यात आली आहे.
एल-टू हॉस्पीटलमध्ये प्रेमनाथ मिश्रा नामक 68 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. याबाबत हॉस्पीटलने नातेवाईकांना कळवल्यानंतर केवळ मुलाच्या भाच्च्याने रुग्णालयात धाव घेतली. त्यावेळी, मृतदेह घेऊन जाण्यासाठी संजय यांनी रुग्णवाहिका मागितली होती. मात्र, शनिवारी दुपारी राप्ती नदीच्या घाटावरुन हा मृतदेह फेकून देण्यात आला. याप्रकरणी, महामारी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. व्हिडिओत पीपीई कीट घातलेली व्यक्ती मृत वृद्धाचा भाचा आहे. तर, दुसरी व्यक्ती मदतनीस.
व्हायरल झालेला व्हिडीओ २९ मेच्या संध्याकाळचा आहे. व्हिडीओत पीपीई किटशिवाय दिसणाऱ्या तरुणाची ओळख पटली आहे. त्याचं नाव चंद्र प्रकाश आहे. तो स्मशानघाटावर काम करतो. काही लोकांनी मला पुलावर बोलावलं होतं आणि मृतदेह खाली फेकला होता, असं प्रकाशनं सांगितलं. 'काही लोक आले आणि त्यांनी मला पुलावर नेलं. मी पुलाच्या दुसऱ्या टोकाला उभा होतो. तेव्हा एका तरुणानं बॅगेची चैन उघडून दगड टाकला आणि मला बोलावलं. त्यानंतर नदीत मृतदेह टाकून परत गेला. इथे लाकडं असल्याचं मी त्याला सांगितलं. पण मृतदेह जलप्रवाहित करायचं असल्याचं उत्तर त्यानं दिलं. त्याच्यासोबत अनेक जण होते. त्यांनी माझं ऐकलं नाही,' असं प्रकाशनं सांगितलं.
मृतदेह नातेवाईकांकडे दिला होता - सिंह
व्हायरल व्हिडीओबद्दल मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. विजय बहादूर सिंह यांना विचारलं असता, नदीपात्रात टाकण्यात आलेला मृतदेह सिद्दार्थनगर जिल्ह्यातल्या शोहरतगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रेमनाथ मिश्र नावाच्या व्यक्तीचा असल्याचं त्यांनी सांगितलं. '२५ मे रोजी कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रेमनाथ यांना संयुक्त जिल्हा रुग्णालयातील एलटू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. २८ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. कोविड प्रोटोकॉलचं पालन करून त्यांचा मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला,' अशी माहिती त्यांनी दिली.