हरीश गुप्ता, राष्ट्रीय संपादक, लोकमतसुशांत सिंग राजपूतचा संशयास्पद मृत्यू हा गेले दोन महिने संपूर्ण देशात मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणात पाटण्यात नोंदविलेल्या गुन्ह्याचा तपास ‘सीबीआय’कडे सोपविण्याचा निर्णय बिहार सरकारने ४ ऑगस्ट रोजी घेतला. यानंतर पूर्वी कधीही पाहायला मिळाली नाहीत अशी अतिशय वेगाने चक्रे फिरली. तो दिवस उलटायच्या आत केंद्रीय गृह मंत्रालयाने बिहार सरकारची विनंती मान्य करून प्रकरणाची फाइल सीबीआयकडे देण्याचे ठरविले.
दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयास तसे कळविले. पण गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गुरुग्राममधील मेदान्त इस्पितळात पूर्ण ‘बेड रेस्ट’ घेत असताना व सीबीआय हा विषय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील नसूनही हे एवढे झटपट झाले तरी कसे? सीबीआय थेट पंतप्रधानांच्या अखत्यारीत येते व त्या दिवशी तर पंतप्रधान मोदी राममंदिराच्या भूमिपूजनाला अयोध्येस जाण्याच्या तयारीत होते. ‘भिंतीला कान’ लावले असता असे कळले की, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवर बोलले व इस्पितळात असलेल्या शहा यांनी तेथूनच चक्रे फिरविली. अमित शहा सीबीआयचे संचालक आर. के. शुक्ला यांच्याशी बोलले व अवघ्या पाच तासांत हे प्रकरण सीबीआयच्या ताब्यात गेले.