शीलेश शर्मा नवी दिल्ली : भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांच्या कंपनीची उलाढाल मोदी सरकार आल्यानंतरच हजारो रुपयातून कोट्यवधी रुपयात कशी परावर्तीत झाली ,असे विचारत काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी पंतप्रधान मोदी यांना सात प्रश्न केले आहेत. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या दोन विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी व अमित शहा यांना तात्काळ हटवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.जय यांची कंपनी टेम्पल एंटरप्राइजेसला ५१ कोटींची रक्कम विदेशातून कोणत्या कामासाठी आली? कोणी दिली? का दिली? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. जय शहा यांची कंपनी विदेशात व्यवसाय करत होती काय? त्यांचा हा व्यवसाय कोणकोणत्या देशात आहे? कंपनी विदेशातून पैसा घेत असताना ईडी, सीबीआयला का शंका आली नाही? प्राप्तिकर विभाग या प्रकरणात का डोळेझाक करत होता? जय यांची चौकशी का केली नाही? ५० हजार रुपयांची कंपनी रात्रीतून करोडोंची कशी झाली? असे सवाल त्यांनी केले.एका खोलीचे भाडे ८० लाख रुपये प्रति महिना दाखविण्यात आले आहे. या खोलीत असे काय होते? एका वर्षात १६ हजार पट वाढ झालेल्या या कंपनीत किती कर्मचारी होते? एकूण देणे किती आणि त्यांची संपत्ती किती? याचा खर्च कसा केला जात होता?, असे प्रश्न काँग्रेसने केले. केआयएसएफने जय यांच्या कंपनीला १६ कोटींचे कर्ज विना तारण दिले. केआयएसएफने कोणत्या कंपनीला कर्ज दिले आहे काय? खंडेलवाल यांना सरकारी स्तरावर काही लाभ तर दिला गेला नाही ना? असे सवाल विचारत, सेबीने खंडेलवाल यांच्या कंपनीवर निर्बंध आणल्याचा उल्लेख काँग्रेसने केला. कालूपूर कॉ. आॅपरेटिव्ह बँकेने ६.२० कोटींच्या संपत्तीवर २५ कोटींचे कर्ज आरबीआयच्या कोणत्या नियमानुसार दिले? आयआरडीएने पीयूष गोयल यांच्याअंतर्गत काम करताना १०.३५ कोटींचे कर्ज खासगी कंपनीला कसे दिले? असेही काँग्रेसचे सवाल आहेत.
अमित शहा यांना तात्काळ हटवा, जय शहांच्या कंपनीला विदेशातून ५१ कोटी का आणि कोणी दिले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:59 AM