नवी दिल्ली : मुस्लीम, दलित तसेच अल्पसंख्याक समुदायातील अन्य लोकांना बेदम मारहाण करून ठार मारण्याचे सध्या सुरू असलेले प्रकार तातडीने रोखावेत, असे खुले पत्र देशातील ४९ नामवंत व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. या नामवंतांमध्ये दिग्दर्शक श्याम बेनेगल, अभिनेत्री अपर्णा सेन, गायिका शभा मुद्गल, इतिहासकार रामचंद्र गुहा आदींचा समावेश आहे.
या पत्रात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत देशात ज्या घटना घडल्या त्याने आमच्यासारखे शांतताप्रिय व भारतीयत्वाचा अभिमान असलेले नागरिक मनातून दु:खी झाले आहेत. देशात २०१६मध्ये दलितांवरील अत्याचाराची ८४० प्रकरणे घडली. अशा प्रकरणांत आरोपींना शिक्षा सुनावण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालात म्हटले आहे. ती वस्तुस्थिती पाहून आम्हाला धक्का बसला आहे.
‘जय श्रीराम’ ही घोषणा आता कोणाच्या तरी विरोधात माथी भडकाविण्यासाठी वापरली जात आहे. अल्पसंख्याकांना होत असलेल्या मारहाणीचा तुम्ही संसदेत निषेध केला. पण तेवढे पुरेसे नाही, असे नमूद करून जमावबळीचे प्रकार रोखण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली असा सवाल पत्रात पंतप्रधानांना करण्यात आला आहे. प्रख्यात बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी, दाक्षिणात्य अभिनेत्री रेवती, सामाजिक कार्यकर्ते बिनायक सेन, समाजशास्त्रज्ञ आशिष नंदी यांनीही या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
त्यांना राष्ट्रद्रोही ठरवू नकाया पत्रात म्हटले आहे की, राम हा देशातील बहुसंख्य लोकांसाठी पूजनीय आहे. रामाच्या नावाचा गैरवापर करणे त्वरित थांबवा. मतभेदांशिवाय खरी लोकशाही नांदूच शकत नाही. सरकारविरोधात मत व्यक्त करणाऱ्यांना राष्ट्रद्रोही, शहरी नक्षलवादी ठरविण्यात येऊ नये.