नवी दिल्ली : बांगलादेशातील आध्यात्मिक नेते चिन्मय कृष्णदास यांची तुरुंगातून तत्काळ सुटका करावी आणि या देशात अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेले अत्याचार थांबावेत म्हणून हंगामी सरकारने तातडीने पावले उचलावीत, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले आहे. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी केंद्र सरकारला एक पत्र लिहून यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.
बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होत असलेले हल्ले, हत्या, लुटालूट व अत्याचारांच्या घटना चिंताजनक असून, रा. स्व. संघ याचा निषेध करतो, असे होसबळे म्हणाले. स्वरक्षणासाठी न्याय मागणाऱ्यांचा आवाज दाबून टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इस्कॉनचे धार्मिक नेते चिन्मय कृष्णदास यांना अटक करून तुरुंगात टाकणे अन्यायकारक असल्याचेही होसबळे नमूद केले आहे.
गेल्या सोमवारी ढाका येथील विमानतळावर कृष्णदास यांना अटक केली. या घटनाक्रमात भारतासह जागतिक समुदाय तसेच संस्थांनी पीडितांच्या बाजूने उभे राहण्याची गरज आहे असे सांगत समुदायाला पाठबळ देण्याचे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
वकिलाच्या हत्येप्रकरणी नऊ अटकेत
बांगलादेशात सरकारी वकील सैफूल इस्लाम यांच्या हत्या प्रकरणात पाेलिसांनी नऊजणांना अटक केली आहे. धार्मिक नेते चिन्मय कृष्णदास यांच्या अटकेनंतर त्यांना जामीन नाकारण्यात आला होता. यानंतर अल्पसंख्याक समुदाय आक्रमक झाला.
यादरम्यान झालेल्या हिंसाचारात वकील सैफूल इस्लाम ठार झाले होते. अटक करण्यात आलेल्यांत बहुतांश अल्पसंख्याक स्वच्छता कर्मचारी आहेत. या प्रकरणात ४६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बंगालमध्ये बांगलादेशी अटकेत
कोलकाता पोलिसांनी शनिवारी अवैधरीत्या भारतात घुसू पाहणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाला अटक केली. सलीम मटुब्बर असे या नागरिकाचे नाव आहे. त्याच्याकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे आढळली नसल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून रवी शर्मा नावाचे एक बनावट आधार कार्ड जप्त करण्यात आले आहे.