जयपूर - राजस्थानमधील नारौर जिल्ह्यातील रूण गावामध्ये एक अजब घटना घडली आहे. येथे सुमारे ५८ वर्षे एकत्र राहिलेल्या पती-पत्नीने एकत्रच जगाचा निरोप घेतला. रूण गावामध्ये या जोडप्याच्या प्रेमाचे उदाहरण दिले जात असे. आता सोबत जगणाऱ्या या जोडीने एकत्रच जगाचा निरोप घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यानंतर या दोघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच अंत्यसंस्काराचे सर्व विधी हे त्यांच्या दोन्ही मुलींनी पूर्ण केले.
रूण गावातील राहणारे ७८ वर्षांचे राणाराम सेन यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना उपचारांसाठी आधी नागौर आणि नंतर जोधपूर येथे नेण्यात आले. मात्र रविवारी सकाळी जोधपूरमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सकाळी आठ वाजता राणाराम यांचा मृतदेह गावात आणण्यात आला. मात्र पत्नी भंवरी देवी यांनी जेव्हा त्यांचा मृतदेह पाहिला तेव्हा त्यांना हा धक्का सहन झाला नाही. त्यांनीही त्याच ठिकाणी प्राण त्यागून जगाचा निरोप घेतला.
रूण गावातील लोक या जोड्याला नशीबवान समजत आहेत. तसेच त्यांच्या अखेरच्या निरोपाची चर्चाही गावात सगळीकडे होत आहे. प्रत्येकजण सांगत आहे की, एवढं प्रदीर्घ दाम्पत्य जीवन जगल्यानंतर एकत्रच जगाचा निरोप घेणारे लोक हे भाग्यवानच म्हटले पाहिजे. राणाराम सेन गावातील शनिदेव मंदिरामध्ये पूजापाठ करत असत. ते धार्मिक प्रवृत्तीचे होते. पती आणि पत्नीमध्ये खूप प्रेम होते. राणाराम आणि भंवरी देवी गेल्या ५८ वर्षांपासून एकत्र राहत होते.