कंगना राणौतमुळं हरियाणात भाजपाला मोठा फटका?; काँग्रेसला मिळालं आयतं कोलीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 12:04 PM2024-09-26T12:04:50+5:302024-09-26T12:05:25+5:30

खासदार कंगना राणौत यांनी कृषी कायद्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांना पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल करण्याची संधी मिळाली आहे.

Impact on BJP in Haryana Election due to Kangana Ranaut statement on Agriculture Law?; Congress Targeted BJP | कंगना राणौतमुळं हरियाणात भाजपाला मोठा फटका?; काँग्रेसला मिळालं आयतं कोलीत

कंगना राणौतमुळं हरियाणात भाजपाला मोठा फटका?; काँग्रेसला मिळालं आयतं कोलीत

नवी दिल्ली - भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत हिनं कृषी कायद्यावरून केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला. कंगनाच्या या विधानानं विरोधी काँग्रेसलाभाजपाविरोधात आयतं कोलीत सापडलं. त्यानंतर काही वेळाने कंगनानं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला मात्र हाच मुद्दा हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाचं टेन्शन वाढवणारा ठरला आहे.

कृषी कायद्यावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर कंगनानं स्पष्टीकरण देत हे माझं व्यक्तिगत मत आहे असं म्हटलं असलं तरी आता त्याचा फायदा नाही, कारण कंगनाच्या या विधानानं हरियाणा भाजपाला विरोधकांनी कोंडीत पकडले आहे. कंगनानं हे विधान मंगळवारी त्यांच्या मंडी मतदारसंघात केले मात्र त्याच्या प्रतिक्रिया हरियाणात उमटायला सुरुवात झाली. हे कंगनाचे बोल नाहीत भाजपाचे आहेत असं काँग्रेसनं निवडणुकीत प्रचार सुरू केला.

मागील महिन्यातही कंगनानं अशाच प्रकारे शेतकऱ्यांवर विधान केल्यानं वाद झाला. त्यावेळी पक्षाच्या नेतृत्वाकडून कंगना राणौत यांना समज देण्यात आली होती. परंतु महिनाभरातच कंगनाने पुन्हा एकदा भाजपाला अडचणीत आणलं आहे. ३ वर्षापूर्वी २०२१ मध्ये शेतकऱ्यांनी केंद्रातील सरकारविरोधात मोठं आंदोलन छेडले. शेतकऱ्यांनी दिल्लीला सर्व बाजूने घेराव घातला. या आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कृषी विधेयके मागे घ्यावी लागली. हे आंदोलन आता कुठे चर्चेत नव्हते परंतु कंगनाच्या विधानाने पुन्हा ते भडकण्याची शक्यता आहे.

काय म्हणाली होती कंगना?

मंडी लोकसभा मतदारसंघात कंगना राणौत यांनी बोलताना ३ कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर होते, ते पुन्हा लागू करायला हवेत. काही राज्यातील शेतकऱ्यांमुळे सरकारने हे कायदे रद्द केले होते. मला माहिती आहे माझ्या या विधानावर वाद होईल परंतु ३ कृषी कायदे पुन्हा लागू करायला हवेत, शेतकऱ्यांना माफी मागायला हवी. स्वहितासाठी हे ३ कृषी कायदे आणावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी करावी असं आवाहन कंगनाने केले. मात्र त्यांच्या या विधानावरुन विरोधकांनी पुन्हा एकदा भाजपाला लक्ष्य केले.  

दरम्यान, वाद चिघळताच कंगनानं व्हिडिओ टाकत यू टर्न घेतला.'जेव्हा कृषीविषयक कायदे आणले, तेव्हा आपल्यापैकी अनेकांनी त्याचे समर्थन केले. पण संवेदनशीलता आणि सहानुभूतीमुळे पंतप्रधानांनी कायदे मागे घेतले. त्यांच्या शब्दाची प्रतिष्ठा राखणे हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. मी आता कलाकार नसून भाजपची  कार्यकर्ता आहे, हेही लक्षात ठेवावे लागेल. माझे विचार माझे नसावेत, पक्षाची भूमिका असली पाहिजे, असंही कंगना राणौत म्हणाली. 'जर माझ्या बोलण्याने आणि विचाराने कोणाची निराशा झाली असेल तर मला खेद आहे,मी आपले शब्द मागे घेते, असंही कंगना राणौत म्हणाल्या.

Web Title: Impact on BJP in Haryana Election due to Kangana Ranaut statement on Agriculture Law?; Congress Targeted BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.