हरीश गुप्ता
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या झालेल्या दारुण पराभवानंतर अधीर रंजन चौधरी यांनी प्रदेश अध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवली आहे, असे समजते. पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी चौधरी यांची तयारी मान्य केलेली नाही. नुकत्याच झालेल्या या निवडणुकीत चौधरी यांनी प्रचार मोहिमेचे नेतृत्व केले होते.
निवडणुकीत झालेल्या अत्यंत मानहानिकारक पराभवाची जबाबदारी घेऊन अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चौधरी यांनी बुधवारी दूरध्वनीवर बोलताना प्रदेश अध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवली. गेल्या ७० वर्षांत काँग्रेसला यंदा प्रथमच एकही जागा जिंकता आलेली नाही. त्याला तीन टक्क्यांच्याही खाली मते मिळाली, विशेष म्हणजे यंदा डावे पक्ष आणि मुस्लीम संघटना आयएसएफशी त्याची युती होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अधीर रंजन चौधरी सध्याही पश्चिम बंगालमध्ये आहेत. ते सोनिया गांधी यांच्याशी दूरध्वनीवर बोलले व त्यांनी पद सोडण्याची तयारी दाखवली. चौधरी यांना गांधी यांनी प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी कायम ठेवा, असे सांगितल्याचे समजते.
शुक्रवारी सायंकाळी चौधरी यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले,“ पक्षाच्या झालेल्या मानहानिकारक पराभवाला मी जबाबदार आहे. प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास मी नकार दिला होता; परंतु ते घेण्याचा आदेश दिला गेला तेव्हा मी माझ्याकडून जास्तीत जास्त चांगले काम केले. आता काय उरले आहे? मी जायला तयार आहे.” तुम्ही प्रदेश अध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवली आहे का, असे विचारले असता चौधरी यांनी तो प्रश्न मी आणि माझ्या नेत्या यांच्यातील आहे, असे सांगितले.
व्यूहरचना अपयशी ठरली काँग्रेसची मते एक तर भाजपला गेली किंवा तृणमूल काँग्रेसला. कारण विधानसभा निवडणुकीत ध्रुवीकरण झाले होते आणि ममता बॅनर्जी त्यांच्या निवडणूक व्यूहरचनेत यशस्वी झाल्या हे मला मान्य आहे. आमची व्यूहरचना अपयशी ठरली आणि पक्षाचा नेता या नात्याने त्याची जबाबदारी माझी आहे,असे चौधरी म्हणाले.