नागपूर : केंद्र सरकारने १५ मे रोजी अधिसूचना काढून तूर, मूग आणि उडीद यांच्या आयातीवर असलेले प्रतिबंध शिथिल केले. त्यामुळे तीन दिवसांतच तूरडाळीचे दर प्रति क्विंटल ३०० रुपयांनी कमी झाले आहेत. याशिवाय तूर, मूग आणि उडदाच्या दरात प्रत्येकी प्रतिक्विंटल २०० रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहक मात्र सुखावला आहे.
देश डाळींमध्ये आत्मनिर्भर बनावा आणि शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून केंद्र सरकारने तूर, मूग आणि उडदाच्या आयातीवर प्रतिबंध लावले होते. या वस्तूंच्या आयातीसाठी सरकार व्यापाऱ्यांना परवाना द्यायचा आणि वर्षभराचे आयातीचे प्रमाण ठरवून दिले जायचे; पण आता आयातीवरील प्रतिबंध हटविल्याने व्यापाऱ्यांना या वस्तूंची आयात कितीही प्रमाणात करता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना या वस्तूंची आधारभूत किंमत मिळणार नाही. त्याचा शेतकऱ्यांना तोटा होणार आहे. केंद्राच्या या निर्णयाने बाजारपेठांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होणार आहे. या निर्णयाचा परिणाम बाजारपेठांवर झाला आहे. अचानक भाव कमी होऊ लागले आहेत.
बुधवारी सायंकाळी तुरीत २०० आणि तूरडाळीच्या किमतीत ३०० रुपयांची घसरण झाली. मुंबई आयातीत लेमन तूर प्रतिक्विंटल ६,५०० ते ६,३००, नागपुरात गावरान तुरीचे दर ७,१५० रुपयांवरून कमी होऊन ६,९५० आणि डाळीचे भाव ८,७०० ते १० हजार १०० रुपये होते. याशिवाय आयातीत उडद मुंबई पोर्टवर २०० रुपयांनी कमी होऊन ६,८००, उडद मोगर ८,४०० ते १० हजार ७०० रुपये आणि चण्यात २०० रुपयांची घसरण झाली. चणाडाळीचे भाव ६,१०० ते ६,७०० रुपयांवर स्थिरावले. डाळीचे भाव ६,६०० ते ६,८०० रुपयांपर्यंत कमी झाले. तर मूग मोगर ८,५०० ते १० हजार ५०० रुपयांपर्यंत कमी झाले. केंद्राच्या निर्णयाचा परिणाम पुढेही घसरणीवर होणार आहे. लॉकडाऊन काळात सरकारचा निर्णय चुकीचा असून, त्यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक फटका होणार असल्याचे मोटवानी यांनी स्पष्ट केले.
व्यापाऱ्यांना द्यावी लागेल साठ्याची माहितीवित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी १७ मे रोजी बैठक बोलावून देशात डाळींच्या उपलब्धतेची चर्चा केली. व्यापाऱ्यांना स्टॉकची माहिती द्यावी लागेल, असे त्यांनी बैठकीत सांगितले. सरकारतर्फे अधिसूचना जारी होताच तीन दिवसांतच बाजारात खरेदी कमी आणि विक्री जास्त झाल्याचे होलसेल ग्रेन अॅण्ड सीड्स मर्चंट असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी सांगितले.