नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात उदभवलेली गंभी परिस्थिती आणि लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीच्या प्रयत्नांमुळे निर्माण झालेले तणावाचे वातावरण यामुळे सध्या देश चिंतीत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी चार वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या या संबोधनाबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून मोठे संकेत दिले आहेत.
महत्त्वपूर्ण, आज संध्याकाळी चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासियांना उद्देशून होणारे संबोधन जरूर ऐका, असे आवाहन अमित शाह यांनी ट्विक करून केले आहे. दरम्यान, ट्विटच्या सुरुवातीला अमित शाह यांनी केलेला IMPORTANT शब्दाचा उल्लेख आणि संबोधन ऐकण्याचे केलेले आवाहन यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी देशवासियांना संबोधित करताना नेमकी कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी नियमितपणे संवाद साधत असतात. मात्र देशात कोरोना विषाणूच्या संसर्गास सुरुरवात झाल्यापासून मोदींनी किमान पाच हे सहा वेळा देशवासियांशी संवाद साधला आहे. त्यातच आता कोरोनासोबत चिनी घुसखोरीचे संकट देशासमोर उभे राहिल्याने संध्याकाळी मोदी नेमकी काय माहिती देतात, तसेच कोणती घोषणा करतात याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे.