नवी दिल्ली - अज्ञात तरुणांनी संसदेची सुरक्षा भेदत सभागृहात उडी मारली होती या घटनेबाबत दिल्ली पोलिसांचे विशेष पथक तपास करत आहे. आतापर्यंत यात ६ लोकांना अटक केली आहे. सर्व आरोपींची चौकशी सुरू आहे. त्यातच आता दिल्ली पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे आणि तथ्य हाती लागले आहेत. या घटनेमागील मास्टरमाईंड ललितने घटनेचे व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर केले होते.
सूत्रांनुसार, ललित झा याने हे व्हिडिओ केवळ शेअर केले नाहीत तर त्याला फॉरवर्ड करण्यासही सांगितले. ललितने कोलकाता इथं राहणाऱ्या सौरभ चक्रवर्तीला हा व्हिडिओ पाठवला आणि त्याला पुढे शेअर करण्यास सांगितले. पोलिसांनी आरोपी झा चं व्हॉट्सअप चॅट आणि सौरभला पाठवलेला व्हिडिओ जप्त केला आहे. सौरभसह अन्य लोकांनाही ललितने व्हिडिओ पाठवला होता.
याआधी पोलिसांनी राजस्थानच्या नागौर परिसरातून मोबाईल फोनचे जळालेल्या अवस्थेत तुकडे जप्त केले. संसदेची सुरक्षा भेदल्यानंतर या घटनेमागील मास्टरमाईंड ललित झा याने आधी मोबाईल फोडला आणि त्यानंतर तो जाळण्याचा प्रयत्न केला. पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी आरोपी ललित झा याला राजस्थानाला नेले आणि तिथून हे तुकडे गोळा केले आहेत. १३ डिसेंबरला प्लॅनिंगनुसार ललितने चार अन्य आरोपींचे मोबाईल फोन घेऊन तिथून पळ काढला होता. १३ डिसेंबरच्या रात्री तो राजस्थानच्या नागौर परिसरातील एका ढाब्यावर पोहचला होता.
याठिकाणी कुचामनचा रहिवाशी महेश कुमावत, अन्य सहकारी कैलाशसोबत ललितने या हॉटेलवर पूर्ण रात्र घालवली त्यानंतर पुरावे असलेले ४ मोबाईल फोनला आग लावली. पुरावे नष्ट केल्यानंतर ललित झा सकाळी दिल्लीला गेला आणि तिथे जाऊन त्याने सरेंडर केले. परंतु दिल्ली पोलीस तपासात या प्रकरणाच्या मुळाशी जात अनेक रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत आहे. मास्टरमाइंड ललित झा स्वतःहून पोलिसांना शरण आला होता. ललित झा याला दिल्लीतील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने ललित झा याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.