लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची कन्या अंजली बिर्ला यांच्या विरोधात अपमानकारक सोशल मीडिया पोस्टबाबत दिल्ली हायकोर्टाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. दिल्ली हायकोर्टाने गुगल आणि सोशल मीडिया साईट एक्स यांना आयआरपीएस अधिकारी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कन्या अंजली बिर्ला यांच्याविरोधात सोशल मीडियावर असलेल्या अपमानकारक पोस्ट हचवण्याचे आदेश दिले आहेत.
ओम बिर्ला यांच्या कन्या अंजली बिर्ला यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत. यादरम्यान, कोर्टामध्ये अंजली बिर्ला यांच्याविरोधात सोशल मीडियावर सातत्याने शेअर करण्यात येत असलेल्या दाव्यांची यादीही सादर करण्यात आली. तीन वर्षे लोटल्यानंतरही आपल्याविरोधात सोशल मीडियावरून खोटी मोहीम राबवली जात आहे, अशी माहिती अंजली बिर्ला यांच्यावतीने कोर्टात देण्यात आली.
वरिष्ठ वकील विनय सक्सेवना यांनी कोर्टामध्ये सांगितलं की, सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांच्या अशिलाची प्रतिमा मलिन केली जात आहे. हा प्रकार सुरू ठेवला जाऊ शकत नाही. त्यानंतर हायकोर्टाने गुगल आणि एक्सला असे दावे असलेल्या पोस्ट २४ तासांच्या आत हटवण्याचे आदेश दिले.
सोशल मीडियावर सुरू असलेल्या बदनामीकारक दाव्यांविरोधात अंजली बिर्ला यांनी दिल्ली हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. अंजली यांनी यूपीएससीची परीक्षा वडिलांच्या राजकीय प्रभावाचा वापर करून जिंकल्याचा आरोप या दाव्यांमधून करण्यात येत होता.