नवी दिल्ली - कोरोना लसीच्या अभावादरम्यान देशी लस कंपनी जायडस कॅडिलाबाबत मोठी बातमी हाती आली आहे. या लसीची चाचणी जवळपास पूर्ण झाली आहे. पुढील काही महिन्यात ही लस लहान मुलांना देण्यास सुरुवात होऊ शकते. कोविड टास्क फोर्सचे डॉ. एन. के अरोडा यांनी याबाबत माहिती दिली आहे. जुलै किंवा ऑगस्ट अखेरपर्यंत जायडस कॅडिला लसीची चाचणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.
एन.के अरोडा म्हणाले की, जायडस कॅडिला लस आल्यानंतर १२ ते १८ वयोगटातील लहान मुलांचं लसीकरण करण्यास सुरुवात होईल. सध्या देशभरात १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण केले जात आहे. तिसऱ्या लाटेपूर्वी केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा मानस आहे. परंतु लसीकरण मोहिमेत तेव्हाच वेग येऊ शकतो जेव्हा मोठ्या संख्यने लस देशात उपलब्ध असेल. जर जायडस कॅडिलाची अंतिम चाचणी सकारात्मक राहिली तर लवकरच या लसीला मंजुरी मिळेल त्यामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
१८ जून २०२१ ला आलेल्या वृत्तानुसार, जायडस कॅडिला पुढील ८ ते १० दिवसांत कोरोना लस ZyCov D च्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारकडे अर्ज करू शकते. सध्या भारतात तीन कोरोना लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. यात कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक लसीचा समावेश आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे. अशात जर १२ ते १८ वयोगटातील लहान मुलांना जायडस कॅडिला कोरोना लस दिल्याने मोठा दिलासा मिळेल.
जायडस कॅडिलाचे तीन डोस
जायडस कॅडिला ही लस जगभरातील इतर लसींपेक्षा वेगळी आहे. अनेक लसींचे दोन डोस दिले जातात. कोविशील्ड, स्पुतनिक आणि कोव्हॅक्सिन या लसींचे दोन डोस दिले जातात. परंतु जायडस लसीचे दोन नव्हे तर तीन डोस लावावे लागणार आहेत.
पुढील काही काळात दिवसाला १ कोटी लसीकरणाचं लक्ष्य
कोविड टास्क फोर्सकडून सांगितले आहे की, तिसरी लाट येण्यास उशीर होणार असल्याचा दावा ICMR च्या रिपोर्टमधून केला आहे. आपल्याकडे लसीकरण करण्यासाठी ६-८ महिने वेळ आहे. येणाऱ्या काळात प्रति दिन १ कोटी लोकांचे लसीकरण करण्याचं लक्ष्य आहे असं त्यांनी सांगितले. त्यासोबतच डॉक्टर गुलेरिया म्हणाले की, भारत बायोटेकच्या लसीचे २ ते १८ वयोगटातील मुलांवर केलेल्या चाचणीचे परिणाम लवकरच येतील. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील निष्कर्ष सप्टेंबरपर्यंत येण्याची आशा आहे. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर भारतात लहान मुलांचं लसीकरण करू शकतो.