नवी दिल्ली - देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राजधानी दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनुपस्थितीत ही बैठक पार पडत असून विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना या बैठकीचे आमंत्रण देण्यात आले होते. त्यामुळेच, मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले असून त्यांच्यासमेवत मुख्य सचिव सिताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे हेही या बैठकीला उपस्थित आहेत.
देशातील वाढत्या नक्षलवादी कारवाईच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महत्वाची बैठक बोलावली असून सकाळी 10 वाजता बैठकीला सुरुवात झाली आहे, दुपारी 2 वाजेपर्यंत बैठक चालणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं नक्षलवाद प्रभावित राज्यांतील मुख्यमंत्र्याशी चर्चा करण्यासाठी या महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीत राज्यांतील नक्षलग्रस्त भागांतील विकास कामांची सद्यस्थिती आणि रखडलेल्या बाबींवर चर्चा केली जाणार आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.
आजच्या या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तेलगंणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, झारखंडचे मुख्यमंत्री, बंगालचे मुख्य सचिव आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीनंतर अमित शहांशी स्वतंत्रपणे भेट घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.