लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या रोषाने मोदी सरकारला बहुमताचा झटका दिल्यानंतर केंद्र सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला आहे. कॅबिनेटने १४ खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. उत्पादकांना त्यांनी काढलेल्या योग्य उत्पादनाची किंमत ठरविता येईल म्हणून एमएसपीमध्ये वाढ केल्याचे सांगण्यात आले.
तेलबिया आणि कडधान्यांसाठी एमएसपीमध्ये सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. नायजरसीड (रामतील) प्रति क्विंटल 983 रुपयांनी वाढले आहे, त्यानंतर तीळ 632 रुपये प्रति क्विंटल आणि अरहर डाळ 550 रुपये प्रति क्विंटलने एमएसपी वाढली आहे. शेतकऱ्यांना एमएसपी म्हणून सुमारे 2 लाख कोटी रुपये मिळतील. गेल्या हंगामापेक्षा हे 35,000 कोटी रुपयांनी अधिक आहे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
धानाचा एमएसपी 2300 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला असून तो गेल्या वर्षीपेक्षा ११७ रुपये जास्त आहे. तूर डाळीची एमएसपी 7550 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली असून ती 550 रुपयांनी वाढविण्यात आली आहे. उडीद डाळीचा एमएसपी 7400 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली असून 450 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुगाची एमएसपी १२४ रुपयांनी वाढविण्यात आली आहे, आता ही 8682 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. तसेच भुईमुगाची एमएसपी 6783 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली असून यात 406 रुपयाची वाढ झाली आहे.
कापसाची एमएसपी ५०१ रुपयांनी वाढवून ७१२१ रुपयांनी वाढविण्यात आली आहे. ज्वारीची एमएसपी १९१ रुपयांनी वाढवून ३३७१ करण्यात आली आहे. मक्याची १३५ रुपयांनी वाढवून २२२५ रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. सूर्यफुलाची एमएसपी ७२३० रुपये प्रतिक्विंटल तर रागीची ४२९० रुपये प्रति क्विंटल, तिळाची ८७१७ रुपये प्रति क्विंटल वाढविण्यात आली आहे.