ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - सियाचीन ग्लेशिअर येथे २५ फूट बर्फाखाली सहा दिवसांनी जिवंत सापडलेले लान्स नायक हनमंतअप्पा यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. पुढचे २४ ते ४८ तास त्यांच्यासाठी महत्वाचे आहेतअसे लष्कराच्या आरआर रुग्णालयाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले आहे.
हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेतून लान्स नायक हनमंतअप्पा यांचे सहा दिवसांनी जिवंत सापडणे हा एक चमत्कारक आहे. हनमंतअप्पा कोमात असून त्यांचा रक्तदाब कमी झाला असल्याचे मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले आहे.
तज्ञ डॉक्टरांचे पथक हनमंतअप्पा यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे. जवानाची किडनी आणि यकृत काम करत नसून, रक्तदाब वाढवण्यासाठी औषधांचा डोस सुरु आहे. अत्यंत थंड वातावरणात ऑक्सिजनचा अभाव असताना हनमंतअप्पा यांचे जिवंत रहाणे एक चमत्कार आहे.
आम्ही त्यांचे प्राण वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करु असे डॉक्टरांनी सांगितले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंह सुहाग यांनी रुग्णालयात येऊन डॉक्टरांकडून हनमंतअप्पा यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.
मागच्या बुधवारी सियाचीनमधील सोनम पोस्ट येथे हिमकडा कोसळला. त्यावेळी तिथे तैनात असलेले दहा जवान हिमकडयाखाली सापडले होते.