नवी दिल्ली - लष्करात निपुण, प्रतिभावंत सैनिकांची फळी निर्माण करण्यासाठी भारतीय सैन्याने सुधारणा कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु केली आहे. प्रमोशनच्या वयामध्ये बदल करण्यात आला असून तरुणांकडे महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येणार आहेत. लष्करात सर्व स्तरावर हा बदल होणार असल्यामुळे योग्य व्यक्तीकडे योग्य जबाबदारी सोपवली जाईल.
ब्रिगेड कमांडर्स, विभागीय कमांडर्स आणि कोअर कमांडर्सला जास्तीत जास्त कार्यकाळ भूषवण्याची संधी मिळावी हा लष्कराचा सुधारणांमागे हेतू असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. नव्या प्रमोशन धोरणाची अंमलबजावणी हा सुधारणा कार्यक्रमाचा भाग आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सैन्यदल असलेले भारतीय लष्कर क्षमता वाढवण्यासाठी नवीन अत्याधुनिक शस्त्रास्त्रे विकत घेत आहे.
चीन आणि पाकिस्तानकडून असलेला धोका लक्षात घेता हे बदल महत्वपूर्ण ठरणार आहेत. नव्या धोरणानुसार 18 महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक असेल तरी कॉपर्स कमांडर्सला आता आर्मी कमांडर म्हणून प्रमोशन मिळेल. आधीच्या धोरणानुसार 24 महिने बढतीसाठी आवश्यक होते. बेशिस्तीची प्रकरणे कठोरपणे हाताळण्याचा निर्णयही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात सरकारने लष्करातील सुधारणांची घोषणा केली.