नवी दिल्ली : ज्यांना गोमांस खायचे, त्यांनी पाकिस्तानात जाण्याचा सल्ला देणारे केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकारी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिले आहे. भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे आणि धर्मनिरपेक्ष देशात खानपानविषयक सवयींवर बंदी लादता येणार नाही, असे रिजिजू म्हणाले.बुधवारी एका वृत्तसंस्थेला फोनवरून दिलेल्या मुलाखतीत रिजिजू बोलत होते. महाराष्ट्रात भाजपप्रणीत युतीचे सरकार आल्यानंतर गोमांस विक्री व खाण्यावर कायद्याने बंदी लादण्यात आली आहे. तेव्हापासून गोमांस बंदीच्या मुद्यावर देशभर वादविवादाला तोंड फुटले आहे. अलीकडे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी गोमांस बंदीचे समर्थन करताना, ज्यांना गोमांस खायचे त्यांनी पाकिस्तानात जावे, असे सांगून वाद ओढवून घेतला होता. त्यांच्या या वक्तव्यावर देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर किरण रिजिजू बोलत होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)कुठल्याही धर्मनिरपेक्ष देशात खानपानविषयक सवयी थांबवता येणार नाहीत, असे रिजिजू म्हणाले. तुम्ही एखाद्या हिंदूबहुल राज्यांत जात असाल तेव्हा तुम्ही तेथील हिंदूची श्रद्धा आणि भावना जपल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे एखाद्या ख्रिश्चन वा मुस्लिमबहुल राज्यांत जाता तेव्हा तेथील बहुसंख्यकांच्या भावनांचाही सन्मान केला पाहिजे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला आपल्या भाव-भावना, श्रद्धा जपण्याचा अधिकार दिला आहे आणि यावर कुठलीही बंदी असता कामा नये, असे ते म्हणाले.४मी गोमांस खातो, मला ते खाण्यापासून कोणी रोखू शकते का? असा सवाल केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी उपस्थित केल्याचे वृत्त बुधवारी माध्यमांनी दिले. खुद्द रिजिजू यांनी मात्र आपण असे म्हटलेच नसल्याचे सांगत, या वादात पडण्यास नकार दिला. ४मी गोमांस खातो, असे मी कधीही म्हणालो नाही. आपल्याला एकमेकांचा धर्म, श्रद्धा आणि खानपानविषयक सवयींचा आदर करायला हवा, केवळ एवढेच मी म्हणालो होतो, असा खुलासा त्यांनी केला. ४संतुलित विचारांचा आदर न करणे आणि हिंदूविरोधात बोलणाऱ्यास धर्मनिरपेक्ष समजण्याची नवी फॅशन भारतात आली आहे; पण धर्मनिरपेक्ष ठरण्यासाठी हिंदूंविरोधात बोलण्याची व्यक्तिश: मला कुठलीही गरज वाटत नाही. ४आपल्याला विकास आणि धार्मिक सलोख्यावर लक्ष केंद्रित करायला हवे, असेही ते म्हणाले.
धर्मनिरपेक्ष देशात खानपान सवयींवर बंदी अशक्य
By admin | Published: May 27, 2015 11:45 PM