- अनिल गोरे, सदस्य, मराठी भाषा सल्लागार समिती, (महाराष्ट्र राज्य)‘एक देश, एक भाषा’ भारतात योग्य नाही. याला कारण भावनिक नाही. तर शास्त्रीय कारण आहेत. भाषा हे भौगोलिक वैशिष्ट्य आहे. एखाद्या भागातला निसर्ग, व्यवसाय, भूभागाचे हवामान, पीक, जीवनपद्धती, कला कौशल्य यांच्याशी निगडित भाषा असते. महाराष्ट्रात भाषा शेतीशी जोडलेली आहे. भारतात विविध भौगोलिक भाषा आहेत. त्यामुळे भारतात ‘एक भाषा’ होऊ शकत नाही.भाषेला गुणात्मक निकष लावला पाहिजे. हिंदी वगळता सर्व भारतीयांना ४०० वर्षांहून अधिक इतिहास आहे. त्यामुळे हिंदी भाषा लादणे योग्य नाही. भारतातील एकूण ४९ भाषा एकत्र करून हिंदी भाषा निर्माण झाली आहे. त्यामुळे ती कृत्रिम भाषा आहे. देशात एकूण ६,७०० बोलीभाषा आहेत. तर जगात २१ हजार भाषा आहेत. जगात एकाही लोकशाही देशाला राष्ट्रभाषा नाही. १३ देशांनाच राष्ट्रभाषा आहे. १९० देशांना नाही. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी या लोकशाही देशांनी राष्ट्रभाषा ठरवलेली नाही. भाषा ठरवली गेली तर देशाचे तुकडे पडतात. भाषेमुळे तुकडे पडल्याने देशांची नावे भाषेवरून ठेवली गेली. पाकिस्तानने राष्ट्रभाषा ठरवण्याचा आगाऊपणा केल्याने पाकिस्तानचे तुकडे पडले. जिनांनी राष्ट्र निर्माण केले म्हणून त्यांच्या आग्रहाखातर उर्दू ही राष्ट्रभाषा ठरवण्यात आली. मात्र १९७१ लाच पाकिस्तानचा पहिला तुकडा पडला. बांग्लादेश बांग्लाभाषेमुळे वेगळा झाला. भारताने ‘एक देश, एक भाषा’ असे सूत्र स्वीकारल्यास देशाचे १६ तुकडे पडतील. पाकिस्तानसारखे दुर्दैव आपल्याकडे होऊ नये. त्यामुळे भारतीय व्यक्तीने ‘एक देश, बहू भाषा’ असा विचार करावा.
देशावर एक भाषा लादणे अयोग्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 2:43 AM