सुधारित- मध्य प्रदेश व्यापमं घोटाळा
By admin | Published: February 18, 2015 12:13 AM
माझे नाव गोवण्यात गलिच्छ राजकारण
माझे नाव गोवण्यात गलिच्छ राजकारण मध्य प्रदेश व्यापमं घोटाळा : केंद्रीय मंत्री उमा भारती यांचा आरोपभोपाळ : मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळ्यात काँग्रेस पक्षातर्फे आपले नाव गोवण्यात आल्याबद्दल केंद्रीय जलस्रोत मंत्री उमा भारती यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या मुद्यावर अत्यंत गलिच्छ राजकारण खेळल्या जात असल्याचा त्यांचा आरोप आहे.मंगळवारी येथे आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, एक वर्षापूर्वी व्यापमं घोटाळ्याशी संबंधित बातम्यांमध्ये माझ्या नावाचा उल्लेख बघून आश्चर्य वाटले होते. ज्या प्रकरणाच्या केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशीची माझी मागणी आहे त्याच घोटाळ्यात अचानक सहा महिन्यांनंतर माझे नाव गोवले जावे हा एक राजकीय कटच आहे. काँग्रेसने केलेल्या आरोपांबद्दल विचारले असता प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आपण याविषयी काहीही वक्तव्य करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दीड वर्षांपूर्वी व्यापमं घोटाळा उघडकीस आला त्यावेळी आपण मुख्यमंत्री शिवराज चौहान यांना या प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या सुपूर्द करण्याचा सल्ला दिला होता. नंतर त्यांनी हे प्रकरण विशेष कृती दलाकडे (एसटीएफ) सोपविण्याचा निर्णय घेतला, असे भारती यांनी नंतर जारी केलेल्या बयानात सांगितले. याप्रकरणी गेल्या वर्षीच पोलीस मुख्यालयात जाऊन बयान नोंदविण्याची माझी इच्छा होती. परंतु एसटीएफचे पोलीस महानिरीक्षक यांनी माझा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते, असे भारती यांचे म्हणणे आहे. सकाळी शिवरात्री उत्सवानिमित्त येथील महाकालचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या उमा भारती यांच्यावर पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार केला. तेव्हा या मुद्यावर आपण तूर्तास काहीही बोलणार नाही. योग्य वेळी पत्रकाद्वारे संपूर्ण चित्र स्पष्ट करू, असे त्यांनी सांगितले होते. पत्रक केव्हा काढणार? असे विचारले असता लवकरच, असेही त्या म्हणाल्या होत्या.काँग्रेसच्या नेत्यांनी सोमवारी या घोटाळ्यावरून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्यावर कडाडून हल्ला चढविताना मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांचा बचाव करण्यासाठी मूळ एक्सेल शीटसोबत छेडछाड करण्यात आल्याचा आरोप केला होता. तपास संस्थांनी भारती यांची भूमिका नाहक वाढवून चढवून दाखविली, असे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांचे म्हणणे होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंग, कमलनाथ, ज्योतिरादित्य शिंदे, सुरेश पचौरी, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अरुण यादव आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सत्यदेव कटारे यांनी संयुक्त पत्रपरिषद घेऊन या घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीची आणि मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मूळ एक्सेल शीटमध्ये उमा भारती यांच्या नावाचा उल्लेख १० वेळा होता. परंतु शीटसोबत छेडछाड करून तो १७ वेळा करण्यात आला, असा दावा या नेत्यांनी केला आहे. भारती यांची प्रतिमा मलीन करण्यासाठीच असे करण्यात आल्याचेही त्यांचे म्हणणे होते. राज्यातील भाजपाच्या राजकारणात मुख्यमंत्री चौहान आणि उमा भारती हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी मानले जातात. (वृत्तसंस्था)