नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या तब्येतील सुधारणा होत असल्याची माहिती एम्स रुग्णालयाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये म्हटले आहे. त्यामुळे त्यांना येत्या काही दिवसांत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. 11 जूनला अटल बिहारी वाजपेयी यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांना नियमित तपासणी साठी दाखल करण्यात आले होते. मात्र, तपासणीनंतर त्यांना मूत्रसंसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर रुग्णालयातच ठेवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. त्यामुळे त्यांच्या तब्येतीबाबत संभ्रम निर्माण झाली होता. दरम्यान, अटल बिहारी वाजपेयींच्या तब्येतीविषयी एम्स रुग्णालयाने मेडिकल बुलेटीन जारी केले आहे. यावेळी एम्स रुग्णालयाचे डॉक्टर म्हणाले की, गेल्या 48 तासांमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. त्यांचे मूत्रपिंड व्यवस्थित काम करु लागले आहे. तसेच, त्यांचा रक्तदाब आणि हार्ट रेटदेखील चांगला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतली होती भेट..अटल बिहारी वाजपेयी यांना रुग्णालयात दाखल केल्याचे कळताच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एम्स रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर संध्याकाळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा व त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण आडवानी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.