नवी दिल्ली: जनरल बिपीन रावत यांच्या निवृत्तीनंतर लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. लष्करातील माझ्या अनुभवामुळे, विशेषत: शेवटच्या दोन कामकाजांमुळे प्रशिक्षणाबरोबरच कार्यबद्दलही मला चांगली कल्पना मिळालेली आहे. त्यामुळे कार्यवाहीमधील तत्परतेचे मापदंड राखणे आवश्यक आहे, असं ते म्हणाले आहेत.
दहशतवाद ही जगभरातील समस्या आहे आणि बर्याच काळापासून भारतही दहशतवादाचा सामना करत आहे. त्यामुळेच संपूर्ण जग आणि दहशतवादाने ग्रस्त असलेल्या अनेक देशांना आपल्याला नेमका कोणता धोका आहे, याची जाणीव होत आहे.आमच्या शेजारील देश दहशतवादाचा वापर करून युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेजारील राष्ट्रांकडून सुरू असलेलं छुपं युद्ध फार काळ चालणार नाही. अशी स्थिती जास्त काळ टिकू शकत नाही. कारण लोकांना सारखं सारखं मूर्ख बनवता येत नाही.अनुच्छेद 370च्या रद्दबातलानंतरच्या परिस्थितीत निश्चितच सुधारणा झाली आहे.हिंसाचाराच्या घटनांमध्ये घट झाली आहे, जम्मू-काश्मीरच्या लोकसंख्येच्या दृष्टीने हे चांगले आहे. प्रदेशात शांतता व समृद्धी आणण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे. युद्धबंदीचे उल्लंघन होत आहे, आम्हाला हे माहीत आहे की पलीकडे जाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या विविध लाँचपॅडमध्ये दुसरीकडे दहशतवादी आहेत, पण आम्ही हा धोका पत्करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.वास्तविक नियंत्रण रेषा कोठे आहे यावर मतभेदांमुळे उल्लंघन होत आहे. नियंत्रण रेषेवर शांतता कशी टिकवायची यासंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून दहशतवाद्यांच्या जमिनीवरच्या हालचाली कमी झालेल्या आहेत.