नवी दिल्ली/न्यूयॉर्क : भारतात आपल्या पेमेंट सेवेची चाचणी घेत असलेल्या व्हॉटस्अॅपने शनिवारी म्हटले की, आम्ही आमच्या सेवा आणि गोपनीयता धोरणात सुधारणा करीत आहोत. पेमेंट सेवेची परिपूर्ण सेवा सुरू करण्यापूर्वी आंतरपरिचालन (इंटरआॅपरेबिलिटी) वैशिष्ट्ये यात आणली जात आहेत.भारतात सध्या एक दशलक्ष लोक व्हॉटस्अॅप पेमेंट सेवेच्या चाचणीत सहभागी आहेत. फेसबुकच्या मालकीची कंपनी असलेल्या व्हॉटस्अॅपचे भारतात सर्वांत मोठे जाळे असून २०० दशलक्ष वापरकर्ते आहेत.व्हॉटस्अॅपच्या प्रवक्त्याने सांगितले की, व्हॉटस्अॅपवरून आर्थिक देवाणघेवाण सहज, सोपी आणि सुरक्षित व्हावी यासाठी आम्ही आमच्या सेवा व गोपनीयता व्यवस्थेत बदल करीत आहोत. नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन आॅफ इंडिया (एनपीसीआय), भागीदार बँका आणि भारत सरकार यांच्यासोबत आम्ही काम करीत आहोत. आमची सेवा कशी काम करेल, याची माहिती आम्ही त्यांना दिली आहे.युनिफाईड पेमेंटस् इंटरफेस (यूपीआय) सेवेद्वारे वित्तीय व्यवहार करण्यासाठी बँकांसोबत भागीदारी करण्याची परवानगी एनपीसीआयने व्हॉटस्अॅपला दिली आहे. व्हॉटस्अॅपने म्हटले की, पेमेंट सेवा कधी सुरू करायची याचा निर्णय अद्याप झालेला नाही. तथापि, गोपनीयता धोरणातील बदलाच्या अनुषंगाने परिपूर्ण सेवा सुरू करण्याच्या दिशेने आम्ही आणखी एक पाऊल टाकले आहे.सूत्रांनी सांगितले की, व्हॉटस्अॅपची पेमेंट सेवा येत्या काही आठवड्यात सुरू होऊ शकते. फेसबुकचा डाटा फुटल्यामुळे व्हॉटस्अॅप पेमेंट सेवेच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर कंपनीने हे निवेदन जारी केले आहे. (वृत्तसंस्था)
पेमेंट सेवेसाठी व्हॉट्सअॅपच्या गोपनीयता धोरणात सुधारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 4:27 AM