नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे तळ नष्ट केल्यानंतर पाकिस्तानी विमानांनीही बुधवारी काश्मीरमध्ये घुसखोरी केली खरी, पण त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चर्चेचा व शांततेचा प्रस्ताव ठेवल्याने भारतापुढे पाकिस्तान नरमल्याचे दिसते. पुलवामा हल्ल्यात पाक दहशतवाद्यांचा हात असल्याच्या भारताच्या आरोपाची चौकशी करण्यास आपण तयार आहोत, अशी नमती भूमिका त्यांनी घेतली. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणाचा पाठिंबा मिळणे शक्य नाही आणि मुस्लीम राष्ट्रेही युद्धजन्य परिस्थितीत मदत करणार नाही, हे इम्रान खान यांच्या लक्षात आल्यानेच ते अचानक मवाळ झाले.
त्यानंतर भारतानेही पुलवामा हल्ल्याचे सारे पुरावे पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्तांना दिले. त्यानंतर पाकच्या विमानांना पिटाळून लावताना, कोसळलेल्या भारतीय विमानाच्या पायलटला सोडण्याची मागणीही पाकिस्तानकडे केली. तसेच त्याला पाकिस्तानने कोणताही शारीरिक वा मानसिक त्रास देऊ नये आणि त्याच्या हवाई दलातील दर्जाप्रमाणे वागणूक द्यावी, असेही भारताने बजावले आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान असे त्याचे नाव आहे.
भारत व पाकिस्तानमध्ये युद्ध होऊ नये, शांतताच असायला हवी, असे सांगत, इम्रान खान यांनी मोठ्या युद्धांमध्ये गणिते चुकतात आणि सर्वसामान्यांची परवड होते, असे नमूद केले. तसेच पहिले व दुसरे महायुद्ध, अमेरिकेने अफगाणिस्थानात केलेली लष्करी मोहीम तसेच व्हिएतनाम युद्ध यांचे दाखलेही दिले. या प्रकरणात अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवाद्यांवर कारवाई करा, असे ठणकावतानाच, भारताची उघडपणे बाजू घेतली होती. पण पाकिस्तानचा मित्र चीननेही दहशतवाद्यांना आश्रय देऊ नका, असे सुनावले. त्यामुळे झालेली पंचाईत इम्रान खान यांच्या वक्तव्यांतून दिसत होती. पाकिस्तान लष्करानेही पडती भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले. भारताने खरोखर युद्ध केले, तर आपण त्याचा सामना करू शकणार नाही, असे लष्कराच्या लक्षात आल्यामुळेच तेथील अधिकाऱ्यांनीही आपली भाषा बदलली.
पाकची नवी भाषापाकिस्तानची ओळख युद्ध करण्यासाठी नाही. शांतता हाच आमचा संदेश आहे. युद्धात कोणाचाच विजय होत नसतो. आम्ही शांततेच्या मार्गावर चालू इच्छितो. भारतालाही शांतता हवी असेल, तर आपण चर्चा करणे गरजेचे आहे. युद्धाच्या माध्यमातून कोणताही मुद्दा सोडविला जाऊ शकत नाही, अशी पाकिस्तानची भूमिका आहे. भारताने आमच्या या प्रस्तावावर शांतपणे विचार करावा.
हवाई दलाचे सहा अधिकारी हेलिकॉप्टर कोसळून मृत्युमुखी
भारतीय हवाई दलाचे एक मालवाहू हेलिकॉप्टर बुधवारी सकाळी बडगाम जिल्ह्यात कोसळले आणि त्यातील सहा अधिकारी व एक स्थानिक रहिवासी असे सात जण त्यात मरण पावले. या हेलिकॉप्टरमध्ये असलेले नाशिकचे स्क्वाड्रन लीडर निनाद अनिल मांडवगाणे हेही या अपघातात मरण पावले.या अपघातानंतर हे हेलिकॉप्टरही आम्ही पाडल्याचा दावा करीत पाकने त्या अपघाताची छायाचित्रे समाजमाध्यमांवर पोस्ट केली. हे एमआय-१७ प्रकारचे हेलिकॉप्टर होते. बडगाम जिल्ह्यातील गरेंद कलाँ या गावी हे हेलिकॉप्टर कोसळले. सुरुवातीला ते विमान असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. सातही जणांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत, तसेच या अपघाताच्या चौकशीचे आदेश हवाई दलाने दिले आहेत.