नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले . यावेळी नरेंद्र मोदींनीकाँग्रेससह इतर विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी म्हणाले की, देशातील जनतेने वारंवार व्यक्त केलेल्या विश्वासाबद्दल आज मी त्यांचे आभार मानण्यासाठी उभा आहे. विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणण्याची सूचना केली, हा मी ईश्वराचाआशीर्वाद मानतो. २०१८ ला देखील ईश्वराचा आदेश होता. तेव्हाही अविश्वास प्रस्ताव आणला होता. यादरम्यान मी म्हणालो होतो की, अविश्वास प्रस्ताव आमच्या सरकारची फ्लोअर टेस्ट नाही, उलट ही त्यांचीच फ्लोअर टेस्ट आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
आम्ही जनतेसमोर गेलो. तेव्हा जनतेने त्यांच्यावर (विरोधक) अविश्वास जाहीर केला. निवडणुकीत भाजप आणि एनडीएला जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे विरोधकांचा अविश्वास ठराव आमच्यासाठी शुभ होता, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, २०२४ च्या निवडणुकीत एनडीए आणि भाजप आधीचे रेकॉर्ड तोडून पुन्हा सत्तेत येणार आहे, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तसेच, संसदेत झालेल्या गदारोळाबद्दल नरेंद्र मोदी म्हणाले, डिजिटल डेटा संरक्षण विधेयक स्वतः तरुणांच्या भावनेशी जोडले गेले होते. अशा स्थितीत यावर गांभीर्याने चर्चा होण्याची गरज होती, पण राजकारणाला आपले प्राधान्य होते, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
याचबरोबर, मागच्या काही दिवसात दोन्ही सभागृहात अनेक विधेयके मंजूर झाली. विधेयकावर चर्चा होणे अपेक्षित होत पण राजकारण तुमच्यासाठी महत्वाचे होते. त्यामुळे तुम्ही गोंधळात सर्व वेळ घातला. देशाच्या जनतेने ज्या कामासाठी यांना इथे पाठवल त्यांचाही विश्वासघात यांनी केला आहे. देशापेक्षा जास्त मोठा त्यांच्यासाठी पक्ष आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे.देशाच्या युवकांच्या भविष्याची तुम्हाला चिंता नाही, तर तुमच्या राजकीय कारकिर्दीची तुम्हाला चिंता आहे. तुमच्या एका एका शब्दाला देश एकत आहे. पण प्रत्येक वेळी देशाला तुम्ही निराशा सोडत आहात, अशी टीका सुद्धा नरेंद्र मोदी यांनी केली.