लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर उत्तर प्रदेशमधीलभाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर्गत घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची माहिती समोर येऊ शकलेली नाही. तत्पूर्वी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. ही बैठक संपल्यानंतर जे. पी. नड्डा यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांच्यासोबत तारभर बैठक घेतली. त्याबरोबरच भूपेंद्र चौधरी यांनी नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली.
दरम्यान, दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यांनी आज सकाळी पक्षाचे नेते आणि मंत्र्यांची बैठक घेतली. मात्र या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित होते. योगी आदित्यनाथ यांनी या पोटनिवडणुकीसाठी सुपर ३० टीम बनवली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात नेतृत्व बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व उत्तर प्रदेशात कुठल्याही प्रकारचा नेतृत्व बदल करू इच्छित नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पक्षनेतृत्वाने राज्यातील नेत्यांना एकजूट राहण्याची आणि निवडणुकीच्या तयारीला लागण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे मागच्या महिनाभरापासून योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांना बळ मिळत आहे. कुठलंही सरकार हे संघटनेपेक्षा मोठं असू शकत नाही, संघटनेपेक्षा कुणीही मोठं नाही, आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे, असं केशव प्रसाद मौर्य यांनी केलेलं विधान सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. मात्र केंद्रीय नेतृत्वाने राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.