घरगुती वाद, पती-पत्नीमधील कलह किंवा एखाद्या वाईट व्यसनामुळे घटस्फोट झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. मात्र, मुलगी न झाल्यानं घटस्फोट दिल्याची अनोखी घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातीलआग्रा शहरातील या घटनेनं सर्वाच्याच भुवया उंचावल्या. खरं तर पत्नीनं सलग तीन मुलांनाच जन्म दिल्यानं पतीनं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. अनेकदा मुलगी झाल्यावर महिलांना कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडावं लागतं. असं लाजिरवाणं कृत्य अनेकदा समोर आलं आहे.
मुलगी झाल्यामुळं घरात वाद झाल्याचंही पाहायला मिळालं आहे. पण, आग्रा येथील एका व्यक्तीनं पत्नी फक्त मुलांना जन्म दिल्याने नाराज होत घटस्फोट दिला. त्याला मुलगी हवी होती. उत्तर प्रदेशातील आग्रा येथून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं संबंधित व्यक्तीला मुलगी हवी यावरून पती-पत्नीमध्ये भांडण झालं होतं, परंतु सलग तीन मुलं झाल्यानंतर पत्नीनं पुढचे मूल जन्माला घालण्यास नकार दिला अन् पतीचा राग अनावर झाला.
पती-पत्नीमधील वाद चिघळलापत्नीचं म्हणणं आहे की, घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही आणि चौथे अपत्य झाल्यास खर्चाचा मेळ कसा बसेल. तसेच पुन्हा एकदा मुलगा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावरून पती-पत्नीमधील वाद इतका खोलवर गेला की तो आग्रा येथील कुटुंब समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचला. याप्रकरणी स्थानिक शहागंज पोलिसांनी एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
१० वर्षांपूर्वी झालं होतं लग्न...आग्रा येथील या जोडप्याचं १० वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना तीन मुलं आहेत, पण मुलगी होत नसल्यानं पती नाराज आहे. मुलगी न झाल्यानं पतीनं पत्नीला सोडलं आहे. यानंतर पीडितेनं कौटुंबिक समुपदेशन केंद्र गाठलं, तिथं समुपदेशकातर्फे पती-पत्नी यांना समज देण्यात आली. परंतु संभाषणातून काही तोडगा निघाला नाही.