अमरावती: आंध्र प्रदेशातील कडापा येथील मेकावरिपल्ली भागात धक्कादायक घटना घडली आहे. लॅपटॉपचा स्फोट झाल्यानं महिला सॉफ्टवेअर इंजिनीयरच्या खोलीला आग लागली. यामध्ये इंजिनीयर ८० टक्के भाजली. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती मृत्यूशी झुंज देत आहे.
बंगळुरूच्या मॅजिक सोल्युशनमध्या कार्यरत असलेली २३ वर्षीय सुमलता अनेक महिन्यांपासून घरातूनच काम करत आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता सुमलतानं नेहमीप्रमाणे काम सुरू केलं. लॅपटॉप मांडीवर ठेऊन ती काम करत होती. तितक्यात लॅपटॉपचा स्फोट झाला. तिच्या खोलीतून धूर बाहेर पडत असल्याचं पाहून आई वडिलांनी मदतीसाठी धाव घेतली. तेव्हा सुमलता त्यांना बिछान्यावर बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. ती गंभीररित्या भाजली होती. आई वडिलांनी तातडीनं घरातील वीज पुरवठा बंद केला.
सुमलताला आधी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून तिला तिरुपतीमधील मोठ्या रुग्णालयात नेण्यात आलं. सध्या तिच्यावर बर्न युनिटमध्ये उपचार सुरू आहेत. ती शुद्धीवर आली आहे. मात्र तिची स्थिती नाजूक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. शॉर्ट सर्किटमुळे लॅपटॉपचा स्फोट झाला असावा असा संशय पोलिसांना आहे. लॅपटॉपची बॅटरी जास्त तापल्यानं स्फोट झाल्याचा अंदाज सुमलताच्या आई वडिलांनी व्यक्त केला. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.