नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी टोमॅटोनं शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणलं होतं. पण, आता त्याच टोमॅटोनं बळीराजाला रडवल्याचे दिसते. नियतीचा खेळ कसा असतो याचं हे उत्तम उदाहरण. अलीकडेच ज्या टोमॅटोनं शेतकऱ्याला आर्थिक ताकद दिली तेच पिक आज शेतकऱ्याला जड झालं आहे. आंध्र प्रदेशात टोमॅटोचं भाव इतके खाली आलं आहेत की, शेतकऱ्यांना ते फेकून द्यावं लागत आहेत. खरं तर राज्यातील घाऊक बाजारात टोमॅटोचं दर किलोमागे दोन ते तीन रुपयांपर्यंत खाली आले आहेत.
दरम्यान, टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. टोमॅटो बाजारात नेणे देखील शक्य होत नसल्याने शेतकरी टोमॅटो रस्त्यावर टाकून देत आहे. आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील पत्तीकोंडा या घाऊक बाजारात एक किलो टोमॅटोची किंमत फक्त ३ रुपये किंवा २ रुपये आहे. तर, १०० किलो टोमॅटोचा भाव केवळ २०० रुपये आहे.
टोमॅटोला दोन रूपयाचा 'भाव'टोमॅटोला भाव नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. बाजारात असलेला टोमॅटोचा साठा शेतकऱ्यांची पिळवणूक करतो आहे. कारण साठ्याच्या तुलनेत टोमॅटोला खरेदीदार नाहीत. किमान २० ते ३० रुपये किलो भाव मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. खते, कीटकनाशके अशा इतर खर्चाव्यतिरिक्त माल वाहतुकीसाठीही पैसे उरत नसल्याने बळीराजा टोमॅटोला बाजारच दाखवत नसल्याचे भीषण चित्र तयार झालं आहे. त्यामुळे काही शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकत आहेत. ग्राहक व्यवहार विभागाच्या वेबसाइटवर टोमॅटोचा भाव २८.४ रुपये किलो आहे. दरम्यान, जुलै महिन्यात टोमॅटोचे दर गगनाला भिडले होते. देशात टोमॅटोचा भाव ४०० रुपये किलोवर पोहोचला होता पण आज चित्र काहीसे बदलल्याचे दिसते.