हृदयद्रावक! दोन मुलींनंतर पुन्हा 'जुळ्या' मुली झाल्या अन् शेतकरी बापानं संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 12:13 PM2023-01-20T12:13:48+5:302023-01-20T12:14:35+5:30
मध्य प्रदेशातील बालाघाट येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
बालाघाट : मध्य प्रदेशातील बालाघाट येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीला दोन जुळ्या मुली झाल्याने त्याने आत्महत्या केली. खरं तर मृत बापाने वैनगंगा नदीच्या पुलावरून उडी मारून जीवन संपवले. लक्षणीय बाब म्हणजे त्याला आधी दोन मुली असल्याने तो तणावाखाली होता. त्याच्या पत्नीची ही तिसरी प्रसूती होती आणि यावेळी मुलगा होण्याची त्याला अपेक्षा होती. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या आत्महत्येमागे कौटुंबिक वादाचाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
माहितीनुसार, आत्महत्येची ही घटना 18 जानेवारी रोजी घडली आहे. एक व्यक्ती सतत मोबाईलवर बोलत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मोबाईलवर बोलत असताना त्याने वैनगंगा नदीत उडी घेतली. अनेकांनी त्याला नदीत उडी मारताना पाहिले. हा प्रकार पाहताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. याठिकाणी पोलीस आणि होमगार्ड नदीत तरुणांचा शोध घेत होते. रात्रीही होमगार्डने अनेक तास शोधमोहीम राबवली. मात्र, तरुणाचा मृतदेह सापडला नाही.
... म्हणून होता तणावात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी सकाळी पुन्हा मृतदेह शोधण्यास सुरूवात केली असता दुपारी 12.15 च्या सुमारास मृतदेह सापडला. मृतदेह बाहेर काढताच पोलिसांनी मृताची ओळख पटवण्यास सुरुवात केली. यादरम्यान या तरुणाचे नाव वासुदेव पटले असल्याची माहिती मिळाली. तपासात पोलिसांना वासुदेवला दोन मुली असल्याचे समोर आले. 18 जानेवारी रोजी त्यांच्या पत्नीने पुन्हा दोन मुलींना जन्म दिला. ही बाब समजल्यामुळे तो तणावात होता. खरं तर मृत व्यक्ती त्याच्या आई वडिलांना एकुलता एक होता. त्याला तीन बहिणी असून त्या विवाहित आहेत. वासुदेव शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करायचा.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"