बरेली – कर्नाटकात झालेल्या हिजाब वादाचे पडसाद देशभरात उमटले. हिजाब परिधान करण्यावरून मुस्लीम मुलींनी आग्रह धरत परीक्षेसही बसण्यास नकार दिला होता. परंतु यूपीच्या बरेलीमध्ये राजकुमारसाठी हिजाबमधून बाहेर पडत मुस्लीम युवतीच्या तोंडून जे शब्द बाहेर पडले त्याची सगळीकडे चर्चा सुरू आहे. हिंदू परंपरेनुसार लग्न करणाऱ्या युवतीने मी अफसाना नाही तर अंजली आहे असं बिनधास्त सर्वांना सांगितले. बरेली आर्य समाज मंदिरात दोघांचा विवाह पार पडला.
याठिकाणी मुस्लीम युवती हिंदू मुलाच्या प्रेमात पडली. त्याच्याशी लग्न केले. मात्र समाजातील काही लोकांच्या नजरेपासून वाचण्यासाठी जोडप्याने दुसऱ्या शहरात जात नव्याने आयुष्याशी सुरुवात केली. पीलिभीतमध्ये राहणाऱ्या राजकुमार व अफसाना दोघंही मजुरी करायचे. मजुरी करतानाच ३ वर्षापूर्वी राजकुमार आणि अफसाना यांची एकमेकांची ओळख झाली. त्यानंतर दोघांनी अनेक ठिकाणी एकत्र काम केले. तेव्हापासून त्यांच्या प्रेमाला सुरूवात झाली. दोघंही एकमेकांकडे आकर्षित झाले. मात्र राजकुमार हिंदू आणि अफसाना मुस्लीम असल्याने दोघांच्या प्रेमात धर्माची भिंत उभी राहिली.
अफसानानं घेतला धाडसी निर्णय
राजकुमारसोबत प्रेमात येणाऱ्या धर्माची भिंत पाडण्याचा धाडसी निर्णय अफसानानं घेतला. अफसानाने हिंदू बनवण्याचा निर्णय घेतला. ती हिंदू प्रथा परंपरेने प्रभावित झाली. हिंदू बनूनच एकत्र राहू असं दोघांनी ठरवले. त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. त्यानंतर फतेहगंजच्या आर्य समाज मंदिरात जात राजकुमार आणि अफसानाने लग्न केले. किलाच्या अगस्त्य मुनी आश्रमचे महंत पं. केके शंखधार यांनी राजकुमार आणि अफसाना यांचं लग्न लावून दिले. अफसानाच्या ३ दिवसांपूर्वी ख्रिश्चन समाजातील युवकानेही हिंदू पद्धतीने लग्न केले. सुमीत आणि त्याची प्रेयसी नूर दोघांनी सनातन धर्म स्वीकारत लग्न केले. आता हे दोन्ही कुटुंब शहरापासून दूर दुसरीकडे जाऊन त्यांचा संसार थाटत आहे. प्रेमात असणाऱ्या व्यक्ती जाती-धर्माच्या भिंती झुगारून सगळ्यांचा विरोध पत्करत एकमेकांशी लग्न करण्याचा धाडसी निर्णय घेतात हे समाजातील काहींना न पटण्यासारखं असतं.