नवी दिल्ली – राजधानी दिल्लीच्या प्रगती मैदानावर भारत मंडपममध्ये जी-२० शिखर संमेलनाचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धाटन केले. यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासमोर भारत या नावाची नेमप्लेट लिहिली होती. सध्या देशात इंडिया-भारत नावावरून वाद उफाळून आला आहे. आगामी अधिवेशनात केंद्र सरकार इंडिया नावाऐवजी भारत या नावाचा वापर करण्याबाबत विधेयक आणू शकते असं बोलले जाते. तत्पूर्वी राष्ट्रपतींनी पाठवलेल्या डिनर निमंत्रणावर प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख होता आणि जी-२० च्या पंतप्रधान मोदींसमोरील टेबलावर इंडिया ऐवजी भारत असा उल्लेख करण्यात आला आहे.
याबाबत भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देत आशा आणि विश्वासाचे नवीन नाव भारत असं लिहिलं आहे. कुठल्याही जागतिक संघटनेच्या अधिकृत बैठकीत त्यांच्या प्रतिनिधींसमोर देशाच्या नावाचा उल्लेख असतो. ज्यातून ती व्यक्ती कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करते हे दिसून येते. G20 शिखर संमेलनात पीएम मोदी यांच्या समोरील प्लेटवर इंडिया या इंग्रजी नावाऐवजी BHARAT असं लिहिले होते. अशावेळी पुन्हा एकदा देशात नाव बदलण्याचे संकेत मिळत आहेत. परंतु अद्यात यावर कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया केंद्र सरकारकडून आली नाही.
काय आहे वाद?
जी-२० शिखर परिषदेनिमित्त आयोजित स्नेहभोजनाच्या निमंत्रण पत्रिकेवर विद्यमान राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांनी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा संकेताबाहेरचा उल्लेख केल्याने देशाचे नाव इंडिया की भारत असा आणखी एक वाद सुरू झाला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आसियान परिषदेतील उपस्थितीनिमित्तही इंडियाऐवजी भारत असा उल्लेख झाल्याने हा मामला आणखी गंभीर वळणावर पोहोचला. विरोधकांच्या आघाडीचे संक्षिप्त नाव इंडिया असल्याने त्या नावाला सत्ताधारी विरोध करीत असल्याचा आक्षेप घेतला गेला. थोडा गंभीर विचार केला तर राज्यघटनेच्या पहिल्या परिशिष्टातच ‘इंडिया दॅट इज भारत’ अशी सुरुवात असताना हा नवीन वाद उफाळून आला आहे.