बिहारमध्ये महाआघाडी तुटीच्या आणि काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर? एवढे आमदार JDUच्या संपर्कात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 06:32 PM2024-01-26T18:32:30+5:302024-01-26T18:33:12+5:30
Bihar Political Update: राजकीय उलथापालथींसाठी प्रसिद्ध असलेल्या बिहारमध्ये सध्या आणखी एका राजकीय उलथापालथीची पटकथा लिहिली जात आहेत. तासागणिक नवनव्या राजकीय घडामोडी घडत आहेत.
राजकीय उलथापालथींसाठी प्रसिद्ध असलेल्या बिहारमध्ये सध्या आणखी एका राजकीय उलथापालथीची पटकथा लिहिली जात आहेत. तासागणिक नवनव्या राजकीय घडामोडी घडत आहेत. दरम्यान, बिहारमध्ये जेडीयू-आरजेडी यांच्यातील महाआघाडी तुटण्याची चिन्हे असतानाच राज्यातील काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. बिहारमधील काँग्रेसचे १० हून अधिक आमदार जेडीयूच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे.
बिहारमध्ये काँग्रेसचे १९ आमदार असून, काँग्रेसने रविवारी आपल्या सर्व आमदारांना पाटणा येथे हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांचीही बैठक होणार आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना या घडामोडी घडल्याने महाआघाडीसमोरील आव्हान वाढले आहे.
सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार जेडीयूचे एक ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री काँग्रेसच्या आमदारांशी सातत्याने संपर्क ठेवून आहेत. त्यावरून राजकीय वर्तुळत चर्चांना उधाण आले आहे. तसेच लवकरच काँग्रेसच्या बिहारमधील संघटनेत मोठी फूट पडेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. बिहार विधानसभेची सदस्यसंख्या २४३ असून, त्यात आरजेडीचे ७९, भाजपाचे ७८, जेडीयूचे ४५, काँग्रेसचे १९, डाव्या पक्षांचे १६, आणि जीतनराम मांझींचे ४ आमदार आहेत. त्याशिवाय ओवेसींच्या पक्षाचा एक आणि एक अपक्ष आमदारही आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारच्या महाआघाडीमध्ये आरजेडी, जेडीयू, काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा समावेश आहे. तसेच या महाआघाडीकडे १५९ आमदारांचा समावेश आहे. जर नितीश कुमार यांनी महाआघाडीची साथ सोडली तर सरकार स्थापन करण्यासाठी १२२ चा आकडा गाठण्यासाठी आरजेडीला आठ आमदारांची आवश्यकता असेल.
दरम्यान, काँग्रेसचे १० आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचीही चर्चा सुरू आहे. आता बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार पुन्हा एकदा पलटी मारणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच ते भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्षांसाठी संकटाची स्थिती निर्माण झाली आहे.