बेगुसराय: बिहारच्या बेगुसरायमध्ये एक अजब प्रकार घडला आहे. कोंबड्यांनी भरलेल्या एक पिकअप ट्रकला अपघात झाला. ट्रक रस्त्याशेजारी असलेल्या एका खड्ड्यात पडला. याची माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. मात्र त्यांनी मदत करण्याऐवजी ट्रकमध्ये असलेल्या कोंबड्या पळवण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तेघरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या विश्वकर्मा चौकाजवळ पिकअप ट्रक उलटला. हा ट्रक भागलपूरला जात होता. त्यावेळी अचानक एक दुचारी ट्रकसमोर आली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक चालक पारसचं नियंत्रण सुटलं. त्यामुळे ट्रक रस्त्याशेजारी असलेल्या एका खड्ड्यात उलटला. पारस आणि ट्रकचा क्लिनर सुदैवानं बचावले. अपघात झाल्याचं पाहून गर्दी जमा झाली.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी येण्यासाठी केवळ ५ मिनिटं लागली. मात्र तितक्या वेळात आसपास असलेल्यांनी ट्रकमधील ३०० कोंबड्या पळवल्या होत्या. 'सकाळी ९ च्या सुमारास अपघाताची माहिती आम्हाला मिळाली. आम्ही ५ मिनिटांत तिथे पोहोचलो. मात्र तोपर्यंत ट्रकमधील बऱ्याचशा कोंबड्या स्थानिकांनी पळवल्या होत्या,' असं तेघरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रिंकू कुमार यांनी सांगितलं.