एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा : बिहारमधील भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविणारे कृषिमंत्री सुधाकर सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपविला आहे. राजदचे प्रदेशाध्यक्ष व सुधाकर सिंह यांचे वडील जगदानंद सिंह यांनी याला दुजोरा दिला आहे.
जगदानंद सिंह यांनी सांगितले की, सुधाकर सिंह यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी लढाई सुरू केली आहे. तेजस्वी यादव हे राजदचे विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत त्यामुळे त्यांच्याकडे राजीनामा दिला आहे. सुधाकर सिंह यांनी शेतकऱ्यांसाठी मंडी कायदा लागू करण्याची मागणी केली होती. यापूर्वी राजदचे मंत्री कार्तिक सिंह यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यावर गुन्हेगारी प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप होता. महिन्यात राजदच्या कोट्यातील दुसऱ्या मंत्र्याने राजीनामा दिला आहे. सुधाकर सिंह यांनी खुल्या व्यासपीठावरून आपल्या विभागातील अधिकाऱ्यांना चोर म्हटले होते. तर, स्वत:ला चोरांचे सरदार असल्याचे सांगितले होते. कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी याबाबत विचारणा केली असता ते बैठकीतून बाहेर गेले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"