गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या चंडीगड महानगरपालिकेत आज झालेल्या वरिष्ठ उपमहापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीचा धक्कादायक निकाल लागला आहे. वरिष्ठ उपमहापौरपदाच्या निवडणुकीत आप आणि काँग्रेसच्या इंडिया आघाडीच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. भाजपाचे उमेदवार कुलजीत संधू सीनियर यांनी उपमहापौरपदाची निवडणूक जिंकली. तर उपमहापौरपदी राजिंदर शर्मा यांनी विजय मिळवला.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी चंडीगड महानगरपालिकेच्या वरिष्ठ उपमहापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. वरिष्ठ उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी सर्व नगरसेवक आणि खासदार किरण खेर यांनी मतदान केलं. भाजपाचे वरिष्ठ उपमहापौरपदाचे उमेदवार कुलजीत सिंह संधू यांना १९ मते मिळाली. तर काँग्रेसच्या गुरप्रीत सिंह गाबी यांना १६ मतं मिळाली. शिरोमणी अकाली दलाच नगरसेवक हरदीप सिंग यांनी भाजपाला मतदान केलं. एक मत बाद ठरवण्यात आलं. अशा प्रकारे भाजपानं ३ मतांनी विजय मिळवला.
चंडीगडच्या महानगरपालिका महापौरपदाच्या निवडणुकीत मोठा वाद झाला होता. तसेच प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते. येथे सर्वोच्च न्यायालयाने निकाल आप आणि काँग्रेसच्या बाजूने दिला होता. तसेच निवडणूक अधिकाऱ्यालाही सर्वोच्च न्यायालयाने फटकार लगावली होती. त्यानंतर आज वरिष्ठ उपमहापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक झाली. मागच्या काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे तीन नगरसेवक हे भाजपात दाखल झाले होते. त्यांनी आज भाजपा उमेदवाराला मतदान केले. आधी काँग्रेस आणि आपचे २० नगरसेवक होते. मात्र आता या दोघांकडे १७ नगरसेवक उरले आहेत.