छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित भागांमध्ये सुरक्षा दलांना मोठ यश मिळालं आहे. पोलीस आणि सीआरपीएफच्या सुरक्षा दलांनी चकमकीमध्ये ८ नक्षलवाद्यांना ठार मारलं आहे. छत्तीसगडमधील नारायणपूर-अबूझमाड येथे ही चकमक सुरू आहे. या चकमकीत एक जवानही जखमी झाल्याचं वृत्त आहे.
दरम्यान, सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक अद्यापही सुरू आहे. तसेच कुतूल, फरसबेडा, कोडतामेटा परिसरामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक सुरू आहे. अबुझमाड येथे चार जिल्ह्यांचे पोलीस मिळून संयुक्त ऑपरेशन करत आहेत.
नारायणपूर-कोंडागाव-कांकेर-दंतेवाडा येथील डीआरजी, एसटीएफ आणि आयटीबीपीच्या ५३ व्या बटालियनच्या फोर्स परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे. मात्र मागच्या दोन दिवसांमध्ये ठरावीक अंतराने चकमकी होत आहेत. दरम्यान, नारायणपूरचे एसपी प्रभात कुमार यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे.
तत्पूर्वी ७ जून रोजी छत्तीसगडमधील नारायणपूर-दंतेवाडा येथील सीमारेषेवर नक्षलवादी आणि जिल्हा रिझर्व्ह फोर्सच्या जवानांमध्ये चकमक ढाली होती. त्यात ७ नक्षलवादी मारले गेले होते.