काँग्रेसशासित तेलंगाणामध्ये रमजानमध्ये मुस्लिम कर्मचाऱ्यांना तासभर आधी काम थांबण्याची सूट, भाजपाचा आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 17:27 IST2025-02-18T17:22:33+5:302025-02-18T17:27:14+5:30
Telangana News: मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली तेलंगाणामध्ये सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारने रमजानच्या महिन्यात मुस्लिम कर्मचाऱ्यांना एक तास लवकर ऑफिस सोडण्याची सूट दिली आहे. ही सवलत २ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत लागू राहणार आहे.

काँग्रेसशासित तेलंगाणामध्ये रमजानमध्ये मुस्लिम कर्मचाऱ्यांना तासभर आधी काम थांबण्याची सूट, भाजपाचा आक्षेप
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली तेलंगाणामध्ये सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारने रमजानच्या महिन्यात मुस्लिम कर्मचाऱ्यांना एक तास लवकर ऑफिस सोडण्याची सूट दिली आहे. ही सवलत २ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत लागू राहणार आहे. त्यामुळे मुस्लिम कर्मचाऱ्यांना रोजे सोडण्यासाठी आणि नमाज अदा करण्यासाठी वेळ मिळणार आहे. ही सवलत शिक्षक, आऊटसोर्सिंग, बोर्ड आणि सार्वजनिक क्षेत्रातील सर्व मुस्लिम कर्मचाऱ्यांना लागू राहणार आहे. मात्र आपातकालिन परिस्थितीत त्यांना थांबावं लागेल.
याबाबतच्या सरकारी आदेशात म्हटलंय की, सरकारने सर्व मुस्लिम सरकारी कर्मचारी, शिक्षक, संविदा, आऊटसोर्सिंग, बोर्ड, निगम आणि सार्वजिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नमाज अदा करता यावी, यासाठी रमजानच्या पवित्र महिन्यात २ मार्च ते ३१ मार्च पर्यंत संध्याकाळी चार वाजता कार्यालय, शाळा सोडण्याची परवानगी दिली आहे. केवळ आणीबाणीची परिस्थिती असल्यास त्यांना कार्यालयात थांबावं लागेल.
दरम्यान, भाजपानेकाँग्रेस सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. हे लांगूलचालन असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. भाजपा नेते अमित मालवीय यांनी टीका करताना लिहिले की, लांगुलचालनाचा किडा तेलंगाणामधील काँग्रेस सरकारला चावला आहे. त्यामुळे रमजान महिन्यात मुस्लिम कर्मचाऱ्यांना एक तास कमी करण्याची परवानी दिली गेली आहे. रमजान महिन्यात मुस्लिमांना ही सवलत दिली जात आहे. मात्र नवरात्रीमध्ये हिंदू कर्मचाऱ्यांना अशी कुठली सवलत मिळत नाही. काँग्रेस मुस्लिमांचा व्होट बँकेसारखा वापर करून घेत आहे, असा आरोपती त्यांनी केला.