Kolkata rape-murder: कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयात झालेल्या तोडफोडीप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येवरून ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. या रुग्णालयाच्या बाहेर सुरू असलेल्या आंदोलनानं बुधवारी मध्यरात्री भीषण वळण घेतलं. आंदोलनस्थळी जमलेल्या जमावानं रुग्णालय आणि परिसरात असलेल्या गाड्यांची तोडफोड केली.
याप्रकरणी गुरुवारी पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पश्चिम बंगाल आणि देशभरात बुधवारी रात्री ११.५५ वाजता 'रिक्लेम द नाईट' मोहिमेचा भाग म्हणून निदर्शनं सुरू झाली. या मोहिमेनं सोशल मीडियाद्वारे वेग घेतला होता. फलक घेऊन पीडितेला न्याय देण्याची मागणी करत समाजाच्या सर्व स्तरातील हजारो महिला रस्त्यावर उतरल्या. सुरुवातीला आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयाबाहेर हे निदर्शन अत्यंत शांतपद्धतीनं सुरू होतं. परंतु, काही वेळातच या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं.
जमावानं जबरदस्तीने बॅरिकेड्स तोडून रुग्णालयात प्रवेश केला. रुग्णालयाच्या तळमजल्यावर असलेल्या आपत्कालीन वॉर्डमध्ये जमावानं घुसून गोंधळ घातला. तसंच, रुग्णालयातील अनेक महागड्या मशिन्स, औषधांचा साठा, डॉक्टरांच्या चेंजिंग रूम आणि पोलिस बॅरेकची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. याशिवाय, जमावानं रुग्णालयाबाहेर उभ्या असलेल्या काही वाहनांची तोडफोड केली. त्यावेळी याठिकाणी पोलिस बंदोबस्त फारच कमी होता. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी इतर ठिकाणांहून पोलिसांना पाचारण करण्यात आलं. यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे या घटनेबाबत आपली प्रतिक्रिया दिली. अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, आरजी कर रुग्णालयामधील गुंडगिरी आणि तोडफोडीनं सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. अशा परिस्थितीत, लोकप्रतिनिधी म्हणून मी कोलकाता पोलिस आयुक्तांशी बोललो आणि हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीची ओळख पटवण्याची विनंती केली. तो कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असला तरी पुढील २४ तासांत त्याला कायद्याच्या कक्षेत आणलं पाहिजे, असं अभिषेक बॅनर्जी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.