EDच्या चौकशीत सोनिया गांधींनी दिली राहुल गांधींप्रमाणंच उत्तरे, केला दिवंगत मोतीलाल व्होरांचा उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 06:30 PM2022-07-27T18:30:28+5:302022-07-27T18:31:22+5:30
Sonia Gandhi: नॅशनल हेराल्ड केस प्रकरणात ईडीने राहुल गांधींपाठोपाठ काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही चौकशी केली. तीन दिवस चाललेल्या या चौकशीमध्ये सोनिया गांधी यांनी ईडीला राहुल गांधी यांच्याप्रमाणेच उत्तरं दिली
नवी दिल्ली - नॅशनल हेराल्ड केस प्रकरणात ईडीने राहुल गांधींपाठोपाठ काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही चौकशी केली. तीन दिवस चाललेल्या या चौकशीमध्ये सोनिया गांधी यांनी ईडीला राहुल गांधी यांच्याप्रमाणेच उत्तरं दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
ईडीने सोनिया गांधी यांना असोसिएट्स जर्नल लिमिटेड आणि यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित आर्थिक देवावघेवाणीबाबत प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांना उत्तर देताना सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांच्याप्रमाणेच उत्तरं दिली. तसेच सांगितले की, आर्थिक बाबींसंदर्भातील गोष्टी मोतीलाल व्होरा सांभाळत होते. मोतीलाल व्होरा यांचं २०२० मध्ये निधन झालं. ते काँग्रेसचे दीर्घकाळ सेवा देणारे कोषाध्यक्ष होते.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा राहुल गांधी यांची चौकशी केली होती. तेव्हा त्यांनीही सर्व देवाण-घेवाण मोतीलाल व्होरा हेच सांभाळायचे असं उत्तर दिलं होतं. राहुल आणि सोनिया गांधी यांच्याशिवाय काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि पवनकुमार बन्सल यांनीही ईडीला हेच उत्तर दिलं होतं.
तपास यंत्रणांनी राहुल गांधींची जून महिन्यात चौकशी केली होती. राहुल गांधी यांनी ईडीला सांगितले होते की, यंग इंडियन एक ना नफा तत्त्वावर चालणारी कंपनी आहे. ही कंपनी अधिनियमाच्या विशेष तरतुदींनुसार सुरू करण्यात आली होती. दरम्यान, या कंपनीमधून एकही पैसा काढण्यात आलेला नाही, असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले होते.