नवी दिल्ली: नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमधील निवडणुकांमध्ये काँग्रेसची धूळधाण उडाली. यातील केवळ एकाच राज्यात काँग्रेसची सत्ता होती. मात्र तीदेखील काँग्रेसनं गमावली. आम आदमी पक्षानं पंजाबमध्ये काँग्रेसचा पराभव करत सत्ता मिळवली. अंतर्गत लाथाळ्यांमुळे पंजाब काँग्रेस चर्चेत होती. आता पराभवानंतरही नेत्यांमधील हेवेदावे संपलेले नाहीत. पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी पंजाबच्या नेत्यांना बोलावलं होतं. या बैठकीत नेते हमरीतुमरीवर आले.
सोनिया गांधींनी बोलावलेल्या बैठकीत पंजाबमधील काँग्रेसच्या पराभवाची कारणमिमांसा करण्यात येणार होती. मात्र बैठकीत नेत्यांचे वाद झाले. त्यांनी पराभवाचं खापर एकमेकांवर फोडलं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमधील नेत्यांनी पराभवासाठी अजय माकन आणि हरिश चौधरी यांना जबाबदार धरलं. काँग्रेसचे एक खासदार तर अजय माकन यांना जल्लाद म्हणाले. पक्षाच्या पंजाब प्रभारींनी आपलं काम नीट केलं नाही, त्यांनी पैसे घेऊन तिकिटं वाटल्याचा आरोप पंजाबच्या नेत्यांनी केला.
पंजाब काँग्रेसचे ८ खासदार बैठकीला उपस्थित होते. बैठकीत घणाघाती आरोप प्रत्यारोप झाले. काँग्रेसच्या खासदारांनी दारुण पराभवाचं खापर प्रभारी हरिश चौधरी आणि स्क्रिनिंग कमिटीचे चेअरमन अजय माकन यांच्यावर फोडलं. २०२१ मध्ये खरगे कमिटीची स्थापना झाली आणि तिथूनच पंजाबमध्ये पक्षाच्या पतनाला सुरुवात झाली. कारण या समितीचा उद्देश केवळ कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवणं होता, असं एका खासदारानं म्हटलं.
अजय माकनदेखील पंजाबमधील खासदारांच्या रडारवर होते. ज्या जल्लादानं दिल्लीतील काँग्रेस बुडवली, त्याला तुम्ही पंजाबमध्ये स्क्रिनिंग कमिटीचं चेअरमन केलं, असं एक खासदार म्हणाला. हरिश चौधरी आणि अजय माकन यांनी पैसे घेऊन तिकिटं वाटल्याचा थेट आरोप खासदार जसबीर गिल यांनी केला.