अहमदाबाद: गुजरातमधील सरकारी शाळांमधील विदारक स्थिती सरकारच्याच आकडेवारीमुळे समोर आली आहे. गुजरातमध्ये ७०० सरकारी प्राथमिक शाळांमध्ये एक-एक शिक्षक सर्व विषय शिकवत आहे. पहिली ते सातवीपर्यंतच्या इयत्तेला एकच शिक्षक असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. काँग्रेस आमदारानं प्राथमिक शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांबद्दल प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना सरकारनं आकडेवारीसह तपशील दिला.
सरकारनं दिलेल्या आकडेवारीवरून काँग्रेस नेत्यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. शाळांमध्ये शिक्षकच नसल्यानं अनेक विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडत असल्याचं काँग्रेस आमदारांनी म्हटलं. कच्छमध्ये १०० प्राथमिक शाळांमध्ये केवळ एकच शिक्षक आहे. सूरतमधील ४३, बडोद्यातील ३८, महिसागर ७४, वलसाडमधील २०, गांधीनगरमधील ९ आणि अहमदाबादमधील ४ शाळांची अवस्था अशीच आहे.
मागील २ वर्ष कोरोनाचा प्रकोप होता. अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले. अनेक शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काहींची बदली झाली. बरीचशी पदं रिक्त आहेत. ती लवकरच भरली जातील, अशी माहिती गुजरात सरकारमधील सुत्रांनी दिली. गेल्या दोन वर्षांत गुजरातमधील ८६ प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्या. तर ४९१ शाळांचं विलनीकरण करण्यात आलं. बंद झालेल्या सर्वाधिक शाळा जुनागढ जिल्ह्यातील आहेत.