अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदींचं होमग्राऊंड असलेल्या गुजरातमध्ये दारुबंदी असल्याचा मोठा प्रचार देशपातळीवर झाला. अर्थातच, नरेंद्र मोदींची प्रतिमा उंचावण्यात या निर्णयाचं मोठं योगदान ठरलं आहे. आजही संपूर्ण गुजरात राज्यात दारुबंदी आहे. मात्र, आता गुजरातच्या इंटरनॅशनल फायनेन्स टेक सिटी म्हणजे गिफ्ट सिटी येथील दारुबंदी हटविण्याचा निर्णय गुजरातमधील भाजपा सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयावर टीका करण्यात येत असून गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष शक्तीसिंह गोहिल यांनी गुजरात ही महात्मा गांधींची भूमी असल्याची आठवण करुन देत भाजपावर निशाणा साधला आहे.
गिफ्ट सिटीमधील दारुबंदी हटविण्याच्या मागे राज्य सरकारला कोणते उत्पन्न दिसत आहे, हे समजत नाही. सरकारला कोणी भरपूर पैसे तर दिले नाही ना, ज्यामुळे दारुबंदी हटविण्याचा निर्णय घ्यावा लागला, असा सवाल शक्तीसिंह गोहिल यांनी उपस्थित केला आहे. ''मी खूप त्रस्त झालो आहे, महात्मा गांधीचं जन्मस्थान होण्याच्या नाते गुजरात नेहमीत नशा आणि दारुपासून दूर राहिला आहे. मात्र, आज गुजरात सरकारने गांधीनगरच्या गिफ्ट सिटीमधील दारुबंदी हटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, येथे येऊन लोक आता दारु पितील. या निर्णयामुळे गुजरातचे मोठे नुकसान होईल. दारुबंदीमुळे गुजरात सुजलाम-सुफलांम होत होता. पण, आज भाजपाने गुजरातला बर्बाद करण्याचा निर्णय घेतला आहे,'' अशी घणाघाती टीका शक्तीसिंह यांनी केली.
दरम्यान, शुक्रवारी गुजरातमधील भाजपा सरकारने गिफ्ट सिटीमधील दारुबंदी हटविण्याचा निर्णय घेतला. जागतिक स्तरावरील आर्थिक व्यवहार आणि पर्यटनासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गुजरात हे महात्मा गांधीचं राज्य असल्यामुळे गुजरातच्या स्थापनेपासूनच राज्यात दारू विक्रीस परवानगी देण्यात आली नाही. गुजरातमध्ये दारुचे उत्पादन, साठवण, विक्री खप या सर्वच बाबींवर बंदी घालण्यात आली आहे. गिफ्ट सिटी व्यतिरीक्त राज्यातील इतर कुठल्याही शहराला अशा प्रकारची सूट यापूर्वी कधीच देण्यात आली नाही.