धक्कादायक! पत्नीचं रूसणं पडलं महागात; पतीने तिला व्हिडीओ कॉल करून उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 07:07 PM2023-01-31T19:07:49+5:302023-01-31T19:09:04+5:30
मध्य प्रदेशातील ग्वालियर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
ग्वालियर : मध्य प्रदेशातील ग्वालियर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील गिरवाई परिसरात एका तरुणाची पत्नी भांडणाचा राग मनात धरून माहेरी गेली. मग संतप्त पत्नीला शांत करण्यासाठी पतीने व्हिडीओ कॉल केला. खूप विनवण्या करूनही पत्नीने माहेरून सासरच्या घरी येण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने व्हिडीओ कॉलवरच तिला फाशी घेईन अशी धमकी दिली. तरीही पत्नीने न ऐकल्याने पतीने गळ्यात फास बांधला. हे पाहून घाबरलेल्या पत्नीने व्हिडीओ कॉल कट केला आणि घटनेची माहिती सासू आणि सासऱ्यांना दिली. सासू-सासऱ्यांनी फासावर लटकलेल्या मुलाला वाचवले. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
पतीसोबतच्या भांडणामुळे पत्नी गेली माहेरी
ग्वालियरच्या गिरवाई पोलीस ठाण्याच्या बिरथरिया परिसरात राहणारे जगमोहन कुशवाह एका खासगी कंपनीत काम करतात. त्यांचे लग्न ग्वालियरमधील ललितपूर कॉलनीत राहणाऱ्या कवितासोबत झाले होते. आठवडाभरापूर्वी पती-पत्नीमध्ये वाद झाला असता कविता घर सोडून ललितपूर कॉलनीतील आपल्या माहेरच्या घरी गेली. आपली पत्नी रूसून माहेरी गेल्याने संतप्त झालेल्या जगमोहनने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. जगमोहनने कविताला घरी येण्यासाठी अनेक वेळा फोन केले, परंतु कविताने सासरच्या घरी परतण्यास साफ नकार दिला. त्यामुळे पती जगमोहन सतत मानसिक तणावाखाली होता.
व्हिडीओ कॉलवर उचललं टोकाचं पाऊल
सोमवारी पहाटे देखील जगमोहन यांनी कविताचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी पत्नी कविताला व्हिडीओ कॉल केला. यादरम्यान त्यांनी पुन्हा कविताला घरी परत येण्याची विनंती केली. मात्र, कविताने घरी येण्यास नकार दिला. संवादादरम्यान जगमोहन यांनी कविताला ती आली नाही तर फाशी घेईन, अशी धमकी दिली. कविताने ती धमकी गांभीर्याने घेतली नाही आणि ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. यानंतर संतापलेल्या जगमोहन यांनी त्यांच्या गळ्यात फास घातला. अशा परिस्थितीत पतीला पाहून कविताने तात्काळ व्हिडीओ कॉल कट केला आणि त्यानंतर सासू आणि सासऱ्यांना फोन करून संपूर्ण घटना सांगितली. जगमोहनचे आई-वडील वरच्या मजल्यावर पोहोचले आणि त्यांनी पाहिले की तो आधीच फासावर लटकलेला होता. कुटुंबीयांनी तात्काळ दोर कापून मुलाला रुग्णालयात नेले. जगमोहन यांचे प्राण वाचले मात्र त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यामुळे त्यांना जैरोग्य रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमधून न्यूरो वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"