हिमाचलमध्ये निकालांआधीच मुख्यमंत्रिपदावरून वाद, दावेदारी ठोकत प्रतिभा सिंह म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 09:17 AM2022-12-08T09:17:45+5:302022-12-08T09:19:37+5:30
Himachal Pradesh Assembly Elections 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये यावेळी सत्तापरिवर्तन होण्याची शक्यता असून, काँग्रेसला पुन्हा सत्तेत येण्याची चाहूल लागली आहे. मात्र निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीवरून रस्सीखेच सुरू झाली आहे.
सिमला - हिमाचल प्रदेशमधील विधानसभेच्या ६८ जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. राज्यात यावेळी सत्तापरिवर्तन होण्याची शक्यता असून, काँग्रेसला पुन्हा सत्तेत येण्याची चाहूल लागली आहे. मात्र निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीवरून रस्सीखेच सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांनी मुख्यमंत्रिपदासाठी अप्रत्यक्षरीत्या दावेदारी ठोकली आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस नेते सुखविंदर सिंह सुक्खू आणि प्रतिभा सिंह आमनेसामने येताना दिसत आहेत. हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करणार आहे. जनतेने वीरभद्र सिंह यांचा चेहरा आणि कामांच्या आधारावर मतदान केले आहेत. काँग्रेसने जी कामं केली आहेत त्यावर जनतेने विश्वास व्यक्त केला आहे. जनता वीरभद्र सिंह यांच्या कामांच्या उपकारांची परतफेड करू इच्छित आहे.
दरम्यान, मुख्यमंत्रिपदाबाबत प्रतिभा सिंह म्हणाल्या की, वीरभद्र सिंह यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मात्र आमदारांचं मत आणि हायकमांड मुख्यमंत्रिपदावर कोण बसेल याचा निर्णय घेईल. काँग्रेसमध्ये कुठलाही गटतट नाही आहे. अनेकजण मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत. आम्ही एकत्र बसून सर्वसहमतीने मुख्यमंत्रपदाचा चेहरा निश्चित करू, असे त्यांनी सांगितले.
हिमाचल प्रदेशमधील मतमोजणीमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची झुंज सुरू आहे. यामध्ये ६८ जागांपैकी ६४ जागांचे कल समोर आले असून, सुरुवातीच्या एका तासाच्या कलांनंतर भाजपा ३० आणि काँग्रेस २९ जागांवर आघाडीवर आहे. तर इतरांनी ५ जागांवर आघाडी घेतली आहे.