संपूर्ण जगतात भारताची ओळख एक हिंदूंचा देश अथवा हिंदू बहूल देश म्हणून आहे. येथे सर्व धर्माचे लोक अगदी आनंदाने राहतात. एवढेच नाही तर भारताचे संविधानही या सर्व धर्मांना आपापल्या धर्माचे पालन आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य देते. धर्मांसंदर्भात जगातील विविध संस्था सातत्याने सर्वेक्षण करत असतात. अशाच एका प्यू रिसर्च नामक संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, 2050 पर्यंत हिंदू धर्म जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म बनेल. तर भारत जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेला देश म्हणून इंडोनेशियाला मागे टाकेल.
प्यू रिसर्च सेंटरच्या "द फ्यूचर ऑफ वर्ल्ड रीजन्स" या अध्ययनात अंदाज वर्तवण्यात आला आहे की, जगभरातील हिंदूंची लोकसंख्या 2050 पर्यंत जवळपास 34% वाढून 1.4 बिलियनवर पोहोचेल. ख्रिश्चन धर्म (31.4%) आणि मुस्लीम धर्म (29.7%) नतंर, जागतिक लोकसंख्येत हिंदूंची लोकसंख्या 14.9% एवढी असेल. तर भारतात इतर कुठल्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक मुस्लीम असतील.
या अध्ययनानुसार, 2050 पर्यंत भारतातील मुस्लिमांची संख्या 310 मिलियन हून अधिक होईल. तर हिंदूंची संख्या 77% सह बहुमतात राहील. तर मुस्लीम सर्वात मोठे अल्पसंख्यक (18%) राहतील.
या तीन मुस्लीम देशांत हिंदूंची लोकसंख्या घटणार - या सर्व्हेक्षणानुसार, भारतात अल्पसंख्यक मुस्लीम समुदायाची संख्या वाढेल, तर काही मुस्लीम बहूल देशांमध्ये हिंदूंची संख्या कमी होईल. कमी प्रजनन दर, धर्मांतर आणि स्थलांतर आदी कारणांमुळे 2050 मध्ये हिंदूंची लोकसंख्या कमी होईल. पहिला देश जेथे हिंदूंची लोकसंख्या कमी होईल, तो म्हणजे पाकिस्तान. 2010 मध्ये तेथे 1.6 टक्के हिंदु होते. जे प्यू रिसर्चनुसार 2015 मध्ये कमी होऊन 1.3 टक्का झाले. यानंतर, बांगलादेशात 2010 मध्ये 8.5 टक्के हिंदू होते. 2050 मध्ये ते 7. 2 टक्के होण्याचा अंदाज आहे. तसेच अफगाणिस्तानात 2010 मधील 0.4 टक्के हिंदू होते. ते आता 0.3 टक्के होण्याचा अंदाज आहे.