फेसबुक-इन्स्टावर मैत्री, मग बनवला अश्लील video; ब्लॅकमेलच्या धमकीने उकळले लाखो रूपये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 12:30 PM2023-01-29T12:30:15+5:302023-01-29T12:30:53+5:30
मध्य प्रदेशातील इंदूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आदी इंटरनेट माध्यमांच्या विविध प्लॅटफॉर्मवर मैत्री करून अश्लील व्हिडीओ बनवून महिलेला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी सायबर सेल पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. सनी चौहान उर्फ राघव चौहान असे आरोपीचे नाव आहे. तो इंदूर येथील रहिवासी आहे.
आरोपी सोशल मीडियावर मुलींशी मैत्री करून त्यांच्याशी जवळीक साधायचा. मग त्यांचा अश्लील व्हिडीओ बनवायचा आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करायचा. आरोपीने जिल्ह्यातील एका महिलेला ब्लॅकमेल करून तिच्याकडून 1.25 लाख रुपये उकळले. आणखी 70 हजार रुपयांची मागणी केल्यावर संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली.
रेल्वेत करतो नोकरी
डीसीपी सेंट्रल डिस्ट्रिक्ट श्वेता चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी चौहान रेल्वेत कंत्राटी कामगार म्हणून काम करतो. पोलिसांनी त्याचा मोबाईल फोन आणि घटनेत वापरलेले तीन सिमकार्ड जप्त केले आहेत. 12 जानेवारी रोजी सायबर सेल पोलीस स्टेशनला एका महिलेकडून सायबर क्राईम ऑनलाइन पोर्टलद्वारे तक्रार प्राप्त झाली होती.
इस्टाग्रामवरून झाली ओळख
तक्रारीत पीडितेने सांगितले होते की, ती तिच्या पतीसोबत करोलबाग येथे राहते. मागील वर्षी जुलैमध्ये पीडितेची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सनी चौहान नावाच्या तरुणाशी ओळख झाली होती. हळूहळू दोघांची मैत्री झाली. ते आपापसात बोलू लागले. अनेक महिने बोलून तिचा विश्वास जिंकल्यानंतर सनीने महिलेचा अश्लील व्हिडीओ बनवला आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून 1.25 लाख रुपये उकळले. खरं तर जेव्हा पीडितेने पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा आरोपीने तिच्या पतीला व्हिडीओ पाठवला आणि पतीकडेही पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. सायबर सेल पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक खेमेंद्र पाल सिंह यांच्या पथकाने करोलबाग येथून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"