जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला मोठे यश आले असून दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना मारण्यात आले असल्याची माहिती कुपवाडा पोलिसांनी दिली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कुपवाडा पोलिसांनी दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे माचल सेक्टरच्या कुमकडी भागात लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत आतापर्यंत घुसखोरी केलेल्या दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले. ऑपरेशन अद्याप सुरू आहे. घटनास्थळावरून आतापर्यंत २ AKS बंदुका, ४ AKMags, ९० राउंड, १ पाकिस्तानी पिस्तूल, १ पाउच आणि २१०० पाकिस्तानी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
दरम्यान, जम्मू-काश्मीरला दहशतवादापासून मुक्त करण्यासाठी लष्कर आणि पोलीस सातत्याने प्रयत्न करत आहेत. अलीकडेच जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग म्हणाले होते की, राज्यातील तरुण पिढीला लक्ष्य करून दहशतवादी कारवायांसाठी पैसा गोळा करण्याच्या उद्देशाने पाकिस्तान आणि त्यांच्या एजन्सी मागील दोन वर्षांपासून अंमली पदार्थाचा वापर करत आहेत. पण, दहशतवाद रोखण्यात पोलीस दलाला यश मिळत आहे. लवकरच उर्वरित दहशतवाद्यांचा देखील शोध लागेल अशी आम्हाला आशा आहे.
"जम्मू-काश्मीरच्या लोकांना शांतता हवी आहे"तसेच जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितले की, सीमेवर असलेल्या पाकिस्तान समर्थित देशविरोधी घटकांच्या नापाक मनसुब्यांना हाणून पाडण्यासाठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून यावर लष्कराचे लक्ष आहे. जम्मू-काश्मीरच्या लोकांना शांतता हवी आहे आणि त्यांनी पाकिस्तानचा दहशतवादाचा चेहरा ओळखला आहे, जो तरुणांना आपल्या लोकांविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करत आहे, असेही सिंग यांनी सांगितले.