नवी दिल्ली – जम्मू काश्मीरच्या कुलगाम इथं एका लष्करी जवानाचे अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ईद साजरी करण्यासाठी सुट्टी घेऊन तो घरी आला होता. संध्याकाळी जवान घरातील काही सामान खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडला. तेव्हापासून तो बेपत्ता होता. या जवानाच्या अपहरणानंतर परिसरात लष्कराने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
लष्कराच्या ज्या जवानाचे अपहरण करण्यात आले त्याचे नाव जावेद अहमद वानी आहे. त्याचे वय २५ वर्ष आहे. तो कुलगामच्या अश्थल भागात राहणारा आहे. त्याची पोस्टींग लेह लडाखमध्ये होती. परंतु ईद साजरी करण्यासाठी तो सुट्टी घेऊन घरी आला होता. ईदनंतर तो त्याच्या घरीच थांबला होता. शनिवारी रात्री ८ च्या सुमारास घरातील काही सामान खरेदी करायला तो चावलगामसाठी निघाला होता. तेव्हापासून जवान बेपत्ता आहे. तो त्याच्या अल्टो कारमधून बाहेर गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबातील सदस्य आणि गावकऱ्यांनी त्याचा शोध घेतला.
तपासावेळी अल्टो कार कुलगामनजीक प्रानहाल येथे जप्त करण्यात आली. कारमध्ये जवानाची चप्पल आणि रक्ताचे डागही आढळले. सध्या या जवानाच्या शोधासाठी लष्कर आणि पोलीस संयुक्त सर्च ऑपरेशन करत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सैन्यातील जवानाच्या अपहरणाचे हे पहिलेच प्रकरण नाही. याआधीही अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. ज्यात दहशतवाद्यांनी सैन्यातील अधिकारी, जवानांचे अपहरण केले आहे. २०१७ मध्येही असाच प्रकार घडला. ज्यात सुट्टीसाठी घरी आलेल्या सैन्यातील युवा अधिकाऱ्याचे शोपिया जिल्ह्यातील दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. त्यानंतर या अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एका लग्न समारंभात हजर राहण्यासाठी हा अधिकारी जात होता.
कुलगामच्या सुरसोना गावात राहणारा २२ वर्षीय लेफ्टिनंट उमर फैयाज ७४ किमी दूर मामाच्या मुलीच्या लग्नासाठी जात होता. रात्री उशीरा दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले. अपहरण केलेल्या अधिकाऱ्याच्या कुटुंबालाही दहशतवाद्यांनी धमकावलं. त्यामुळे त्यांनी या प्रकाराची माहिती पोलीस अथवा सैन्याला दिली नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या युवा अधिकाऱ्याचा मृतदेह हरमैन परिसरातील त्याच्या घरापासून ३ किमी अंतरावर सापडला. मृतदेहाचे पोस्टमोर्टम केल्यानंतर खूप जवळून युवकाला गोळ्या मारल्या होत्या. त्याच्या डोक्यात, पोटात आणि छातीत गोळ्या होत्या.