दोन बायका फजिती ऐका... याचा प्रत्यय देणारी घटना उत्तर प्रदेशातील झांसी जिल्ह्यात घडली. पहिल्या पत्नीचा मृत्यू आणि दुसऱ्या पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतर तिसऱ्यांदा बोहल्यावर चढत असलेल्या युवकाची चांगलीच फजिती झाली. खरे तर तिसऱ्या लग्नात संबंधित तरूणाच्या पहिल्या दोन्हीही पत्नींनी हजेरी लावली अन् एकच खळबळ माजली. लग्नाच्या ठिकाणी वऱ्हाडी मंडळी जात होती. अशातच नवरदेवाला दोन्ही पत्नी आल्याची खबर मिळाली. मग त्याने लग्नस्थळी न जाणे पसंत केले. दुसरीकडे नवरीकडील मंडळी वाट पाहत राहिली. मग प्रकरण पोलिसांत पोहोचल्यावर लग्न थांबवावे लागले. आरोपी नवरदेवाला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. जितेंद्र कुमार असे तिसऱ्यांदा लग्न करत असलेल्या मुलाचे नाव आहे, त्याचे लग्न जवळच्या गावातील दीपा या तरूणीशी ठरले होते. गुरुवारी लग्न होते पण अचानक नवीन विघ्न आल्याने एकच तारांबळ उडाली.
लग्नस्थळी पाहुणे मंडळी जेवणाचा आस्वाद घेत होती. तितक्यात विनीता आणि पूजा नावाच्या दोन महिला लग्नस्थळी आल्या. या महिलांनी आम्ही 'वर' जितेंद्रच्या पत्नी असल्याचे सांगितले. संबंधित महिला सांगत असलेल्या बाबी ऐकून वधू पक्षाकडील मंडळीच्या पायाखालची जमीन सरकली. विनीताच्या म्हणण्यानुसार, १० वर्षांपूर्वी जितेंद्र आणि तिचे लग्न झाले होते, त्यांना दोन मुली देखील आहेत. तर पूजाने सांगितले की, जितेंद्रने पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला असल्याचे सांगून माझ्याशी विवाह केला. आम्हाला एक मुलगी असून, आता तो धोखा देऊन दीपाशी तिसरे लग्न करत आहे. पूजा आणि विनीताचे म्हणणे ऐकल्यानंतर ग्रामस्थांनी नवरदेव जितेंद्रशी संपर्क साधला असता त्याने फोन उचलला नाही. जिंतेद्रचे सत्य समोर आल्याने त्याने पळ काढला.
नवरीकडील मंडळीच्या म्हणण्यानुसार, जितेंद्रने पहिल्या पत्नीचा मृत्यू आणि दुसरीसोबत घटस्फोट झाला असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आम्ही जितेंद्र आणि दीपा यांच्या विवाहाला मंजुरी दिली. लग्नस्थळी वाद चिघळताच पोलिसांनी मध्यस्थी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आता लग्नसोहळा स्थगित करण्यात आला आहे. दोन्ही पत्नींना बोलावून त्यांची चौकशी केली जात आहे. वधू पक्षातील मंडळी देखील पोलिसांच्या संपर्कात आहे. चौकशीअंती संबंधित तरूण जितेंद्रला ताब्यात घेण्यात आले आहे. दोषींवर लवकरच कारवाई केली जाईल.